दुष्काळग्रस्त भागातील पाल्यांना शुल्क माफी करावी
By Admin | Published: July 18, 2015 01:56 AM2015-07-18T01:56:08+5:302015-07-18T01:56:08+5:30
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेताना शुल्क माफी देण्यात यावी.
प्रशासनाला निवेदन : शासनाकडून कार्यवाहीची अपेक्षा
हिंगणघाट : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेताना शुल्क माफी देण्यात यावी. यासह आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना ही सवलती जाहीर करण्याची तरतुद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्यावतीने करण्यात आली. या मागणीच्या पूर्ततेकरिता मुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले.
येथील उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक चणचण सोसावी लागते. महाविद्यालयीन व उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचा बोजा सहन होत नाही. त्यामुळे त्यांना अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागते. शेतकऱ्यांच्या पाल्यांना अनेकदा कामावर जावे लागते. त्यामुळे उपस्थिती कमी होऊन गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यातच आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची मुले, मुली यांना शिक्षण घेताना शुल्क माफी करावी. याकरिता तरतुद करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना फी सवलत व शिष्यवृत्ती मिळत नाहीत. स्थगित झालेया या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी रायुकाँचे सौरभ तिमांडे, प्रशांत लोणकर, प्रा. सचिन थारकर, गौरव तिमांडे, अमित कोपरकर, राहुल तिवारी, शेख अजर, चेतन भालेराव, मोहम्मद अजानी, आदेश मोजे, सौरभ वैतागे यासह आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक चणचण सोसावी लागते. त्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. उच्च शिक्षण घेताना अडचण येऊ नये याकरिता फी सवलत दिल्यास ही अडचण होईल.
यासह आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी तरतुद करावी. शिष्यवृत्ती स्थगित झाली असून त्या त्वरीत देण्याचे आदेश पारित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.