वर्धा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:58 PM2018-04-24T23:58:55+5:302018-04-24T23:58:55+5:30

रेती घाटांतून कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या, शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविणाºया तथा पिकांचे सिंचन करून अन्नधान्य पिकविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत.

In the wake of Wardha river pollution | वर्धा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

वर्धा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देस्वच्छतेबाबत प्रशासन, सामाजिक संघटना उदासीन : कचऱ्यामुळे पाण्याला दुर्गंध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेती घाटांतून कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या, शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविणाºया तथा पिकांचे सिंचन करून अन्नधान्य पिकविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. वर्धा नदी घाटांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देते; पण या नदीच्या स्वच्छतेकडे अद्याप प्रशासन तथा सामाजिक संघटनांनीही लक्ष दिल्याचे दिसत नाही. परिणामी, वर्धा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.
जीवनदायिनी म्हणून नद्यांचा उल्लेख केला जातो; पण हल्ली नद्यांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवाय शासनाने यशोदा नदीखोरे पुनरूज्जीवन प्रकल्पही राबविला. खासगी संस्था, शासन तथा लोकसहभागातून हे प्रकल्प राबविले जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील अन्य नद्या, तलाव स्वच्छ होतील, असे वाटत होते; पण मागील कित्येक वर्षांपासून वर्धा नदीच्या स्वच्छतेसाठी मुहूर्तच सापडत नसल्याचे दिसून येत आहे. काही संघटनांनी गणेशोत्सव, दूर्गोत्सवादरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्याचेच दिसून येत आहे.
शासन, प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागातूनच वर्धा नदी पात्राचे पुनरूज्जीवन करणे अगत्याचे आहे; पण पुलगाव नगर पालिका प्रशासन तथा परिसरातील ग्रामपंचायतींकडून विशेष लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच शासन, प्रशासन वर्धा नदीकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. वर्धा नदीच्या पुलगाव शहराच्या सिमेवरून वाहणाºया पात्रातील पाणी प्रदूषित झाले आहे. पाण्यावर सर्वत्र हिरवे, पिवळे तवंग असून शेवाळ साचलेले आहे. अनेक ठिकाणी बेशरमची झाडे वाढली असून कचºयाने पात्र उथळ झाल्याचे दिसून येत आहे. नदीच्या पात्रातच अमरावती जिल्ह्यात अनेक विटभट्ट्या सुरू करण्यात आल्या आहेत. काही रेती माफीयांनी नदी पात्रालाच साठवणुकीचा अड्डा बनविले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वर्धा नदीचे पात्र धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
नदी बचावासाठी पुढाकार गरजेचा
वर्धा नदीचे पात्र धोक्यात आले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. नदी पात्रातील शिल्लक पाणी हिरवे, पिवळे दिसून येत असून ते पिण्यायोग्य आहे वा नाही, हे तपासणेच गरजेचे झाले आहे. पुलगाव येथे वर्धा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली नसल्याने हा प्रकार घडत आहे. वास्तविक, पुलगाव शहरांसह ग्रामीण भागाची तहान भागविणारी ही वरदायिनी आहे; पण तिच्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसून येत आहे. सामाजिक संघटना व प्रशासनही गप्प असल्याचे दिसते. शिवाय राजकीय पक्षही राजकारणातच व्यस्त दिसतात. वर्धा नदी बचावासाठी सर्वांनी पुढाकार घेत प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: In the wake of Wardha river pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.