जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखविल्या जाताहेत वाकुल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:17+5:30
शनिवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता विभाग नियंत्रकांच्या दालनासमोरच ‘मास्क व सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करू नये' असा सूचनाफलक दिसून आला; पण प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयातही मास्कचा वापर करावा, या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखी सूचनेकडे पाठच दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काही मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांना दिल्या आहेत. त्याबाबतचा लेखी आदेशही या कार्यालयांना पाठविण्यात आला आहे; पण याच आदेशातील महत्त्वपूर्ण मास्क क्रमप्राप्तच्या सूचनेकडे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात सुमारे १२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीला या कार्यालयातील काही कर्मचारीही कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते; पण नंतर हळूहळू निम्म्याहून अधिक कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने सध्या या कार्यालयात बऱ्यापैकी मनुष्यबळ आहे. शनिवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता विभाग नियंत्रकांच्या दालनासमोरच ‘मास्क व सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करू नये' असा सूचनाफलक दिसून आला; पण प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयातही मास्कचा वापर करावा, या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखी सूचनेकडे पाठच दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यामुळे रापमंच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काेरोनाची भीती नाही काय, असा प्रश्न येथे विविध कामानिमित्त येणाऱ्यांना पडत आहे.
दंडात्मक कारवाई करणार कोण?
- कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या खबरदारीच्या सूचनांकडे पाठ दाखविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत; पण रापमंच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करणार कोण, असा प्रश्न चर्चिला जात आहे.