कागदपत्रांकरिता उपविभागातील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:02+5:30
सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पायपीट व गर्दी टाळण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतीचा हंगाम तोंंडावर आला असताना पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. याकरिता आवश्यक असलेले कागदपत्रे मिळविण्याकरिता शेतकरी तहसील, तलाठी कार्यालय तसेच बँकेत गर्दी करण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने शेतकऱ्यांची पायपीट थांबविण्यासह गर्दी टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्ध्यासह आजुबाजुच्या परिसरातील शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीकरिता पीककर्जासाठी विविध बँकांकडे अर्ज करीत आहे. पीककर्जाकरिता फेरफार पंजीची प्रत, सद्यस्थितीतील सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय व बँकेमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पायपीट व गर्दी टाळण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँक आणि महसूल विभागच शेतकऱ्यांच्या अर्जानुसार कागदपत्राची उपलब्धता करुन देणार असल्याने शेतकºयांची पायपीट थांबणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर राबविताहेत उपक्रम
बँकेकडे पीककर्जाकरिता शेतकऱ्यांचा अर्ज आल्यावर बँकेने सर्व शेतकऱ्यांच्या शेत सर्व्हे नंबरसहित बॅकनिहाय यादी बनवून तलाठी व तहसील कार्यालयाकडून आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या सूचीसह बँकेचा पत्ता वर्धा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कुणाल गजानन डबरे यांच्या kgdabre25@gmail.com या संकेतस्थळावर DVOT-Surekh या फॉन्टमध्ये पाठवायची आहे. बँकेकडून यादी प्राप्त होताच यादीनिहाय आवश्यक सातबारा व फेरफारपंजी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. काही अडचणी असल्यास कनिष्ट लिपिक कुणाल डबरे व नायब तहसीलदार डॉ.एस.आर.पाराजे यांच्याशी संपर्क साधावा. कागदपत्राकरिता शेतकºयाला तहसील किंवा तलाठी कार्यालयात पाठवू नये, असेही बँकाना सूचित करण्यात आले आहे. हाउपक्रम वर्धा उपविभागात प्रायोगित तत्त्वावर राबविला जाणार असून यात यश मिळाल्यावर जिल्ह्याकरिता हा प्रयोग राबविला जाणार आहे.
जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची पीककर्जाविषयी चर्चा केली. पीककर्जाकरिता फेरफार पंजी व सातबारा आदी कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता शेतकरी तलाठी किंवा तहसील कार्यालयात गर्दी करण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्याकरिता बँकांनी आलेल्या अर्जानुसार आवश्यक कागदपत्रांची यादी पाठविल्यास त्यानुसार कागदपत्र उपलब्ध करुन देण्याची योजना पहिल्यांदा वर्धा उपविभागात प्रायोगित तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील यश लक्षात घेऊन इतर उपविभागातही सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा