भिंती झाल्या अबोल, प्रचाराचे हायटेक बोल; व्हॉट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वाढला वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:55 PM2024-10-26T16:55:45+5:302024-10-26T16:57:03+5:30
Wardha : मोबाइलवरच प्रचाराचा धुरळा
वर्धा : पूर्वी निवडणुका म्हटल्या की. हँडबिल, मोठमोठे कागदी पोस्टर्स, भोंगे, रंगविलेल्या भिंती, बिल्ले असे प्रचाराचे माध्यम होते. विशेष म्हणजे जो तो राजकीय पक्ष विविध रंगांनी आपल्या प्रचारासाठी गावातील भिंती रंगवायचा. रंग मिळो वा न मिळो, चुना, गेरू आणि निळीने त्या भिंती अगदी उठून दिसायच्या. आज ती परिस्थिती राहिली नाही. आता ना भिंती रंगवायची गरज ना कुठे फारसे भोंगे लावण्याची गरज आहे. आता थेट इंटरनेटद्वारे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे आली असून थेट मतदारांच्या मोबाइलवर प्रचाराचा धुरळा दिसून येतो.
येत्या २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. सध्या डोअर टू डोअर, सभा, रॅलीने प्रचार सुरू असला, तरी मोबाइल व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया यांसारखे मेसेज पोहोचविणारे प्लॅटफॉर्म मतदारांवर प्रभाव टाकण्याचे माध्यम ठरत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत. सत्ताधारी पक्ष मोबाइलवरील व्हॉट्सअॅपवर त्यांनी जनतेसाठी राबविलेल्या योजनांचे मेसेज आणि पत्र पाठवून पक्षांशी आणि पुढाऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हॉट्सअॅपचे सक्रिय वापरकर्ते असून, सत्ताधारी पक्षाचे पत्र व मेसेजमधून सरकारच्या यशस्वी योजनांबद्दल प्रकाश टाकला जात आहे. तसेच, मतदारांकडूनसुद्धा राबविलेल्या योजनांबद्दल अभिप्राय मागविला जात आहे, तर विरोधक आम्ही मतदारांसाठी काय करणार, कुठल्या योजना राबविणार, महिला व गरिबांना अनुदान देणार, शेतकऱ्यांचे कर्ज तसेच वीजबिल माफ करणार, अशा अनेक योजना व उपक्रमांबाबत मतदारांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डीजेचा दणदणाट, गावागावांत प्रचाराचा धुरळा
निवडणूक आता रंगात यायला लागली आहे. ५ नोव्हेंबरपासून शहरासह गावागावात प्रचाराचा धुरळा उडणार असून डीजेचा दणद- णाटही सुरू होणार आहे. आता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, अद्याप पूर्ण उमेदवार जाहीर झाले नसल्याने सामसूम आहे. सोमवारी शक्तिप्रदर्शनातून अर्ज दाखल केले जाणार असून, प्रचाराला जोर पडकला जाईल. प्रचार गीते आणि घोषणाबाजींनी थेट रणांगणा- वरील युद्धाचा आभास होणार, पूर्वीचे बिल्ले आणि गाडीला बांधलेले भोंगे हद्दपार झाले असून आता मोठमोठे बॅनर व फ्लेक्सने जागा घेतली आहे. डीजेवर वाजणारी गाणी मतदारांना आकर्षीत करणार आहेत. मोबाइलवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार प्रचार पराकोटीचा आहे. उतमेदवार विविध आश्वासने देऊन मतदारांना भूरळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
केलेल्या विकासकामांचा वाचला जातोय पाढा
सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहे. या वापर मोठ्या प्रमाणात सुरु असून, राजकीय पक्ष व पुढाऱ्यांना व्हॉट्सअँप ग्रुपमधून मतदारांशी जलद आणि चांगल्या प्रकारे संवाद साधणे आता सोपे आणि शक्य झाले आहेत. मोठ्या वापरकर्त्यांना त्यांची कामगिरी हायलाइट करण्यात आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यास मदत होते. कोणत्याही निर्बंधाशिवाय राजकीय पक्षांना जनतेशी त्वरीत संपर्क साधण्यासही मदत होते. इन्स्टाग्राम किंवा एक्स मीडियासारखे इतर अनेक प्लटॅफॉर्म विशिष्ट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत असल्याने त्याचे स्वरूपही वेगळे असते