भरकटलेला वाघ देवळी तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:19 AM2018-10-11T00:19:33+5:302018-10-11T00:21:16+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे) शिवारात काहींना सदर वाघाचे दर्शन झाले असून त्याने दोन जनावरांचा फडशा पाडला. यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सदर वाघाने आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर हल्ला केला नसला तरी परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. याच वाघावर यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी सुमारे महिनाभर पाळत ठेवली होती. तर वर्धा जिल्ह्यात या वाघाने प्रवेश केल्यापासून वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर आहेत. कुठलीही अनुचित घटना टाळता यावी. शिवाय सदर वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाता यावे याकरिता रस्ता मोकळा करून देत नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याची माहिती सदर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावात जावून नागरिकांना देत आहेत. सदर वाघ हिंगणघाट तालुक्यातील पोहणा नजीकच्या गावांमधील शेतशिवारामध्ये असताना त्याला पिंजराबंद करण्यासाठीचा विनंती प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात आला होता. परंतु, त्यावर अद्यापही कुठलाही निर्णय न झाल्याने या वाघाला स्थानिक वन विभागाच्या अधिकाºयांना पिंजराबंदही करता येत नसल्याचे सांगण्यात येते. सुमारे अडीच ते साडेतीन वर्ष वयोगट असलेल्या या वाघामुळे सध्या शेतकºयांसह नागरिकांच्या अडचणीत भर टाकली आहे.
आंबोडासह कोळोणा (चोरे) भागात भीती; दोन जनावरांचा पाडला फडशा
देवळी : तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या गावातील दोन जनावरांचा फडशा वाघाने पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वाघाचा मुक्तसंचार होत असल्याच्या विषयाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात आहे.
सदर वाघाने आंबोडा येथील गुणवंत अजाब मडावी यांच्या शेतात असलेल्या वासराला गतप्राण केले. मडावी यांचे शेत आंबोडा-कानगाव मार्गावर आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात जनावरे बांधली होती. रात्रीच्या सुमारास वाघाने सदर जनावरांवर हल्ला करून वासराला गतप्राण केल्याने पशुपालक मडावी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले असून त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तर बुधवारी या वाघाने कोळोणा (चोरे) येथील युवराज पोहेकर यांच्या मालकीच्या रेड्याचा फडशा पाडल्याचे उघडकीस आले आहे. पोहेकर यांचे घर गावाचे शेवटी असून याठिकाणी हे जनावर बांधून होते. तेथे त्याच्यावर हल्ला करून वाघाने ही शिकार भारत भस्मे यांच्या शेताजवळील नाल्याचा आवारात ओढत नेली. दरम्यान दिलीप बोबडे व त्याच्या कडील काही मजूरांना या वाघाचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर समस्त ग्रामस्त जागे झाले. दरम्यान वाघानेही गावा शेजारच्या आवारातून पळ काढला. हा वाघ छाव्याच्या शोधात भटकला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे. आंबोडानंतर लगेच दुसºया दिवशी कोळोणा चोरे येथे हा वाघ आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
कानगावात उलट-सुलट चर्चेला उधाण
वायगाव (नि.) : कानगाव नजीकच्या आंबोडा गावात वाघाने गाय ठार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव येथे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने सतर्कतेबाबत गावात दवंडी देण्यात आली आहे. शेतात एकटे न जाता रात्रीला महिला व पुरुषांसह लहान मुलांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर काही नागरिकांनी वायगाव परिसरात वाघाला बघितल्याची उलट-सुटल चर्चा होत आहे.
गाय केली गतप्राण
मोझरी (शेकापूर) - परिसरात वाघाने गाय ठार केली. या घटनेमुळे परिसरातील पाच ते सहा गावांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनीही सतर्क राहून वाघाला आपल्या नैसर्गिक अधिवासात परत जाऊ द्यावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात येत आहे. नजीकच्या आंबोडा व भैय्यापूर शिवारामध्ये वाघाने शेतातील गोठ्या बांधून असलेल्या गायवर हल्ला करून तिला ठार केले. परिसरात वाघाचा मुक्तसंचार होत असल्याने वन विभागाच्या अधिकाºयांनी परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मोझरी परिसरातील खानगाव, नांदगाव, कोसुर्ला, पोटी, डौलापूर, भैय्यापूरातील ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतीची कामेही ठप्प पडली आहेत.
आंबाडा (गिरोली) शिवारात गोºह्याची शिकार
चिकणी (जामणी) : हिंगणघाट तालुक्यात भटकंती झाल्यानंतर देवळी तालुक्याकडे वाघाने मोर्चा वळविला आहे. देवळी तालुक्यातील आंबोडा (गिरोली) येथील गुणवंत मडावी यांच्या मालकीच्या गोºह्याची शिकार या वाघाने केल्याने परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या पूर्वी या वाघाने काही पाळीव प्राण्यांची शिकार केली असली तरी आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर त्याने हल्ला केलेला नाही. वाघाचा मनुष्यावरील हल्ला टाळता यावा यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.