समितीमध्ये सदस्यत्व, हवी मंचावर संधी; दहा-पंधरा हजारांची पावती फाडा आधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 10:47 AM2023-02-02T10:47:07+5:302023-02-02T10:53:27+5:30
संमेलन आयोजकांची अशीही ऑफर : शिक्षकांनंतर आता प्राध्यापकांनाही घालताहेत गळ
वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान वर्धानगरीला मिळाला आहे. मायबोलीच्या समृद्धीकरिता भव्यदिव्य आयोजनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज झाली आहे; पण, या आयोजनाच्या अर्थबळाकरिता ‘पावती’ बुकांचा कार्यक्रम राबविल्या जात असल्याने वेगळीच चर्चा व्हायला लागली आहे. शिक्षकांनंतर आता प्राध्यापकांनाही दहा ते पंधरा हजारांची पावती फाडण्याची गळ घातली जात आहे. इतकेच नाही तर समितीचे सदस्यत्व आणि मंचावर संधी देण्याचीही ऑफर दिली जात असल्याचे काहींनी बोलून दाखविले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पावनभूमीत ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत होणारे हे संमेलन ‘न भूतो न भविष्यती’ व्हावे याकरिता जिल्हा प्रशासन, आयोजन समिती आणि वर्धेकर कामाला लागले आहेत. या संमेलनाकरिता शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला ५० लाखांचा निधी दिला आहे. परंतु यातील निम्माच निधी आयोजकांकडे आला आहे. लोकप्रतिनिधींचाही ५५ लाखांचा निधी आचारसंहितेत अडला असून तो मिळणारच. अशातच आयोजकांनी येणाऱ्यांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयीकरिता १ हजारांपासून तर ४ हजारांपर्यंत शुल्क आकारले आहे.
तब्बल ३ कोटींचा खर्च असलेल्या या संमेलनाकरिता अर्थसाहाय्य मिळावे म्हणून पावती बुकाच्या माध्यमातून आयोजक मदत घेत आहेत. शासन, प्रशासनही मैदानात उतरले असून तेही आर्थिक भर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रत्येकी ५०० रुपयांची पावती फाडण्यास सांगितले होते; पण, याला अनेकांनी विरोध केला होता. आता मराठीसह इतर विषयांच्या प्राध्यापकांनाही ५ हजारांपासून १५ हजारांपर्यंत पावती फाडण्याचा आग्रह धरला जात असल्याचे काही प्राध्यापकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. इतकेच नाही तर, संस्थाध्यक्ष किंवा प्राचार्यांच्या माध्यमातून दबावतंत्राचाही वापर होत असल्याचे ते म्हणाले.
ठराविकांनाच संधी, प्राध्यापकांमध्ये खदखद
जिल्ह्यात साधारण पन्नासेक मराठी विषयाचे प्राध्यापक असतील. यातील काही कार्यरत तर काही सेवानिवृत्त झालेले आहेत; पण, संमेलनाबाबत यांच्याशी संपर्क साधला गेला नाही किंवा काही बैठकही घेतली गेली नाही. संमेलनाच्या आयोजनासह विविध समित्यांमध्ये ठराविक व्यक्तींनाच संधी दिल्याची खदखद व्यक्त होऊ लागली आहे.
वर्ध्यातील संमेलनाची नागपूरकर ‘शोभा’ करणार?
या संमेलनाकरिता नागपूरकर मंडळीही कामाला लागली आहे. संमेलनावर शासनाचेही लक्ष असल्याने नागपूरकर मंडळी त्याकरिता सक्रिय आहे. संमेलनासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी लगेच उपराजधानीपर्यंत पोहोचत आहेत. उपराजधानीतील काही साहित्यिक आणि सक्रिय व्यक्तींच्या सूचनांवरूनच कार्यक्रमातील पाहुण्यांची नियुक्ती झाल्याचीही माहिती पुढे येत आहे. वर्धेकरांच्या आयोजनासंदर्भातील माहिती नागपूरपर्यंत तात्काळ पोहोचत असल्याने आयोजकांसह स्थानिक प्रशासनाचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे नागपूरकर वर्ध्यातील संमेलनाची ‘शोभा’ करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे संमेलन ऐतिहासिक व्हावे, यासाठी आमचा वर्धेकरांच्या सोबतीने पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. एकाच वेळी दोन साहित्य संमेलने होत असल्याने कोण काय बोलतो किंवा आरोप करतो, याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. शिक्षकांकडून पैशांची मागणी आयोजकांनी केलेली नाही, ती शिक्षण विभागाकडून केल्याची माहिती आहे. आता प्राध्यापकांनाही आम्ही कोणतीही पावती फाडण्याचा आग्रह धरला नाही. हे संमेलन आपले आहे, ते आपलेपणाने साजरे करण्याचा प्रयत्न आहे.
- प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ