प्रभाग तीन, चार केला स्वच्छ
By admin | Published: June 26, 2017 12:38 AM2017-06-26T00:38:04+5:302017-06-26T00:38:04+5:30
शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी युवा परिवर्तन
युवा परिवर्तनचे आंदोलन : न.प.च्या स्वच्छता अभियानाची पोलखोल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेकडून स्वच्छता आंदोलन केले जाते. या ंअंतर्गत शहरातील विविध प्रभागात प्रत्येक शनिवार व रविवारी संघटनेचे कार्यकर्ते स्वच्छता करतात. याच आंदोलना अंतर्गत शनिवारला प्रभाग क्रमांक तीन तर रविवारी प्रभाग क्रमांक चार येथे गांधीगिरीचा अवलंब करीत युवकांनी स्वच्छता करुन पालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल केली.
या आंदोलनात प्रभाग क्रमांक तीनमधील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्यात आल्या. तसेच ठिकठिकाणी पडून असलेला कचरा आदोलनकर्त्यांनी गोळा केला. यानंतर संपूर्ण प्रभागातील कचरा संकलीत करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
पालिका प्रशासनाकडून प्रत्येक वॉर्डात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रभागातील परिस्थिती भिन्न असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. त्यामुळे पालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानाची पोलखोल झाली. या भागातील बहुतांश नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ होणे क्रमप्राप्त होते. मात्र, नाल्या स्वच्छ न करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी घरात शिरण्याचा धोका आहे. युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत आंदोलनादरम्यान परिसरातील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करुन वाहत्या केल्या. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, धरम शेंडे, साहिल नाडे, शुभम कुरील, शैलेश पंचेश्वर, जयंती मिश्रा, रागिनी शर्मा, प्रगती देशकर, स्रेहा वैरागडे, सुरभी चनप, सोनाली डायरकर यांचा सहभाग होता.
कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
प्रभाग क्रमांक चार मधील इसाजी ले-आऊट, आरती टॉकीज चौक येथील कचरा युवकांनी गोळा करुन विल्हेवाट लावली. यानंतर नागरिकांनी समस्या मांडल्या. रहिवाशांनी पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत रोष व्यक्त केला. घंटा गाडीकरिता पालिकेकडून शुल्क आकारण्यात येत असले तरी नियमीत कचरा उचलण्यात येत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.