वर्धा गर्भपात प्रकरण : तपास यंत्रणांकडून गर्भपाताच्या गोळीबाबत लपवाछपवीच !
By महेश सायखेडे | Published: September 27, 2022 03:23 PM2022-09-27T15:23:27+5:302022-09-27T15:31:44+5:30
माहिती अधिकाराने कदम रुग्णालयाचे पितळ पाडले उघडे
वर्धा : राज्यातील आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडविणाऱ्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचा विविध बाजूने तपास करणाऱ्या यंत्रणांकडून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या 'मिसोप्रोस्टोल' या गोळीबाबत मागील नऊ महिन्यांपासून मोठी गुप्तता बाळगण्यात आल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीअंती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे जी- ४३३/३८२२ या बॅच नंबरची 'मिसोप्रोस्टोल' ही गर्भपातासाठी वापरण्यात येणारी गोळी कदम हॉस्पिटलमध्ये सापडली होती; पण तपास यंत्रणांकडून गुप्तता बाळगण्यात धन्यता मानल्या गेल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.
'मिसोप्रोस्टोल' आणले कोठून?
कदम हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आलेल्या औषधांत जी-४३३/३८२२ या बॅच नंबरची 'मिसोप्रोस्टोल' टॅबलेट, बी-१२७२००४ या बॅच नंबरचे कार्बोपोस्ट इंजेक्शन, ऑक्सिटोसीन इंजेक्शन, माला-एन आदींचा समावेश आहे. हे औषध अवैध गर्भपाताचा अड्डा पाहिलेल्या या हॉस्पिटलमध्ये आले कसे हे कोो अजूनही उलगडलेले नाही.
३३ महिन्यांत १,२२० मिसोप्रोस्टोलचा पुरवठा
अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम हे आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाला कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा द्यायचे. याच शासकीय रुग्णालयाला आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी ३३ महिन्यांच्या काळात तब्बल १ हजार २२० मिसोप्रोस्टोल टॅबलेटचा पुरवठा झाला होता.
अन्न व औषध प्रशासनातील औषध प्रशासन कदम हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या औषधांबाबतची चौकशी करीत आहे. कदम हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची गोळी मिसोप्रोस्टोल सापडूनही तपास यंत्रणांकडून गुप्तता बाळगण्यात आली; पण माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनंतर हे पितळ उघडे पडले आहे. हे शासकीय औषध नेमके कुठून आले? याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.
- ताराचंद चौबे, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते, वर्धा.