कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभाग 'रडार'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 11:31 AM2022-01-25T11:31:58+5:302022-01-25T11:48:06+5:30

आर्वीच्या कदम हॉस्पीटलमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम तर सहआरोपी डॉ. नीरज कदम यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Wardha Abortion Case : health department are on police radar | कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभाग 'रडार'वर

कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभाग 'रडार'वर

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा गर्भपात प्रकरण शासकीय ऑक्सिटोसिनच्या अपहाराचा शोध घेण्यात ढिम्म

महेश सायखेडे

वर्धा : अवैध गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत असलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये महिलेला प्रसूती कळा येण्यासाठी तसेच प्रसूती पश्चात महिलेचा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शासकीय रुग्णालयातील १ एमएलच्या एचआयओसी २०३७ व एचआयओसी २०४० बॅच क्रमांक असलेले आणि जून २०२२ मध्ये मुदतबाह्य होणारे तब्बल ९० इंजेक्शन सापडले.

या संदर्भात आर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी आर्वी पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनीही संशयितांचे नाव कळवावे, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे. परंतु चार दिवसांचा कालावधी लोटूनही या पत्राला आरोग्य विभागाकडून उत्तर न देण्यात आल्याने अवैध गर्भपातांचा अड्डा राहिलेल्या कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभागाची वाटचाल संथच, असे बोलले जात आहे.

रेडिओलॉजिस्ट देण्याकडेही दुर्लक्ष

अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्यावर आर्वी पोलिसांकडून कदम हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिन सील करण्यात आली आहे. याच सोनोग्राफी मशिनमधील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांना पोलिसांनी लेखी पत्र दिले आहे. परंतु अद्यापही जिल्हा शल्यचिकित्सकांनी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून दिलेला नाही.

ऑक्सिटोसिन अपहाराचे केंद्र नेमके कोणते?

एचआयओसी २०३७ व एचआयओसी २०४० बॅच क्रमांक असेल्या शासकीय ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील आणखी काही जिल्ह्यांनाही पुरवठा झाला आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाला याच बॅचचे ४ हजार ५०० ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा पुरवठा मागील वर्षभरात झाला असून, नुकताच तेथील ऑक्सिटोसिनचा साठा शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आला. तेथे सध्या ३०० ऑक्सिटोसिन इंजेक्शन शिल्लक असून, या इंजेक्शनबाबतचा आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड व्यवस्थित असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. असे असले तरी शासकीय ऑक्सिटोसिनच्या अपहाराचे केंद्रही अद्याप शोधून काढण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही.

अभ्यास गट समिती शोधणार केवळ त्रुट्या?

आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यावर आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडविल्यावर या प्रकरणाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. मनीषा पाटील यांच्या स्वाक्षरीने सहा सदस्यीय अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलमधील माहितीही जाणून घेतली असली तरी त्यांचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. विशेष म्हणजे ही समिती पीसीपीएनडीटी कायद्यात काही त्रुट्या राहिल्या काय, यासह कदम हॉस्पिटलमध्ये पीसीपीएनडीच्या कुठल्या नियमांचा भंग झाला याचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

डॉ. रेखा अन डॉ. नीरज कदमची जामिनासाठी न्यायालयात धाव

आर्वीच्या कदम हॉस्पीटलमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम तर सहआरोपी डॉ. नीरज कदम यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींच्या वतीने जामिनासाठी वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर गुरुवार २७ रोजी सुनावणी होणार आहे. आर्वी पोलिसांनी अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल केल्यावर सुरुवातीला आरोपी डॉ. रेखा कदम यांना अटक केली. त्यानंतर कदम कुटुंबीयातीलच दुसरा व सहआरोपी असलेल्या डॉ. नीरज कदम याला अटक करण्यात आली. सध्या डॉक्टर दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: Wardha Abortion Case : health department are on police radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.