आर्वीतील गर्भपात प्रकरण; आरोग्य विभागाचे आस्ते ‘कदम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 10:50 AM2022-01-18T10:50:13+5:302022-01-18T10:57:19+5:30
आर्वी येथील डॉ. रेखा कदम हिने पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन परिचारिका आणि डाॅ. नीरज कदम यालाही अटक केली आहे.
चैतन्य जोशी
वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपाताची घटना संपूर्ण राज्याला धक्का लावून गेली. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असतानाच आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे पत्र पोलीस विभागाने दिले होते. मात्र, घटनेला चार दिवस उलटूनही आरोग्य विभागाकडून अद्यापही तक्रार दाखल करण्यात न आल्याने आरोग्य विभागाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे.
आर्वी येथील डॉ. रेखा कदम हिने पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन परिचारिका आणि डाॅ. नीरज कदम यालाही अटक केली आहे. पोलिसांनी रुग्णालय परिसरात असलेल्या बायोगॅसच्या चेंबरमधून १२ मानवी कवट्यांसह गर्भपिशवी आणि ५४ हाडे जप्त केली. त्यानंतर कदम रुग्णालयात केलेल्या तपासणीत टास्क फोर्सला मुदतबाह्य झालेला औषधी साठाही आढळून आला. मात्र, कारवाईच्या रडारवर असलेल्या ‘कदम’ रुग्णालयावर आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नाही, हे आश्चर्यच आहे.
बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावणे, रुग्णालयात अवैध गर्भपात करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे यासह शासकीय रुग्णालयातील औषधी खासगी रुग्णालयात आढळणे यासंदर्भात तक्रार दाखल करणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले दिसून येत नसल्याने आरोग्य विभागाचा ढिम्म कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कवट्यांसह हाडांची करणार डीएनए चाचणी
आरोग्य विभागाकडून पोलिसांना अद्याप अहवाल प्राप्त झाला नसलयाने पोलीस केवळ दाखल असलेल्या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. यात पोलिसांकडून या प्रकरणातील पीडिता आणि अल्पवयीन मुलाचा, तसेच रुग्णालयाच्या आवारात सापडलेल्या कवट्यांची डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कदमांच्या नातेसंबंधात
संपूर्ण देशभर गाजत असलेल्या आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस रजेवर असल्यामुळे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे यांच्याकडे या तपासाचे काम करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यांनी आर्वी येथे जाऊन या प्रकरणाचा तपासही केला.
आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातूनही वरिष्ठ अधिकारी येथे दाखल झाले होते. मात्र माजी खासदार नानाजी उर्फ जगजीवन राम कदम यांच्या कुटुंबाशी भिसे परिवाराचे असलेले संबंध आर्वीसह जिल्ह्यात अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे डॉ. संगीता भिसे यांच्या चौकशी समितीत जाण्याचा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र आरोग्य यंत्रणेतील अनेक अधिकारी संगीता भिसे यांच्या कार्यतत्परतेबाबत जाणून असून त्यांची नेहमीच भूमिका ही ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ अशा धोरणाची राहिली असल्याचे वैद्यकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात त्या कदमांना वाचवण्याची भूमिका घेतील; अशी शक्यता फार कमी आहे.