वर्धा गर्भपात प्रकरण; ४० वर्षांपासून गर्भपात करूनच चालत होता कदम रुग्णालयाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 04:58 PM2022-01-15T16:58:55+5:302022-01-15T17:00:17+5:30

Wardha News मागील ४० वर्षांपासून गर्भपात करूनच कदम रुग्णालयाचा डोलारा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येऊ लागले आहे.

Wardha abortion case; Kadam Hospital's had been undergoing abortion for 40 years | वर्धा गर्भपात प्रकरण; ४० वर्षांपासून गर्भपात करूनच चालत होता कदम रुग्णालयाचा डोलारा

वर्धा गर्भपात प्रकरण; ४० वर्षांपासून गर्भपात करूनच चालत होता कदम रुग्णालयाचा डोलारा

Next
ठळक मुद्दे सासूचा वैद्यकीय वारसा सुनेने चालविलाअखेर पापाचा घडा फुटला

वर्धा : संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या आर्वीतील गर्भपात प्रकरणात आणखी रहस्य उलगडत चालले आहेत. मागील ४० वर्षांपासून गर्भपात करूनच कदम रुग्णालयाचा डोलारा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येऊ लागले आहे. नागरिकांची तोंडेही फुटू लागली असून, रुग्णालयात नेहमी असेच प्रकार सुरू राहायचे, अशी खमंग चर्चा आता आर्वी शहरात होऊ लागली आहे. त्यामुळे हे अवैध गर्भपात प्रकरण आणखी काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्वी येथील डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून तपासाला तत्काळ गती दिली आणि डॉ. रेखा कदम हिला अटक केली. विशेष म्हणजे पोलीस कोठडी दरम्यान तिने गर्भपात केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या चमूला सोबत घेऊन रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बायोगॅस चेंबरमध्ये त्या अल्पवयीन मुलीच्या गर्भातील भ्रूणाचा शोध घेतला. मात्र त्या चेंबरमध्ये १२ कवट्या आणि ५४ हाडं आढळून आल्याने पोलिसांनाही धक्काच बसला आणि डॉ. रेखा कदम हिच्या पापाचा घडा फुटला. त्यानंतर पोलिसांनी दोन परिचारिकांनाही अटक केली. डॉ. रेखा कदम हिच्या सासू डॉ. शैलजा कदम यांना ताब्यात घेतले. पण, प्रकृती खालावल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही धक्कादायक बाब संपूर्ण राज्यात माहिती होताच सर्व स्तरांतून निषेध नोंदविण्यात आला.

डॉ. कदम यांच्या रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून अवैधरित्या गर्भपात करूनच कोटी रुपयांची माया जमविल्याची माहितीही आता पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे या पापाच्या घड्यात आणखी कोण कोण सहभागी आहेत, हे आता पोलीस तपासणार आहेत.

तीन महिन्यांत झाले ५६२ गर्भपात

जिल्ह्यात एकूण ३४ खासगी, तर ११ शासकीय गर्भपात केंद्र आहेत. मागील तीन महिन्यात १२ आठवड्यांपर्यंतचे ५२६ तसेच २० आठवडे झालेले एकूण ३६ गर्भपात करण्यात आल्याची शासकीय नोंद आहे. त्यामुळे कदम रुग्णालयात एकूण किती गर्भपात झाले याचीही तपासणी आरोग्य विभागाच्या चमूकडून केल्या जात असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विधी सल्लागार ॲड. कांचन बडवाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

सासूच्या परवान्यावरच सुनेने केला गर्भपात?

४० वर्षे जुने असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलजा कदम यांच्या नावे गर्भपाताच्या शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर कोणताही गर्भपात केंद्राचा परवाना नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सासूच्या परवान्यावरच सुनेचा गर्भपाताचा अवैध व्यवसाय सुरू होता, असे आता नागरिक सांगत आहेत. या दिशेनेही पोलीस तपास करणार आहेत.

Web Title: Wardha abortion case; Kadam Hospital's had been undergoing abortion for 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.