वर्धा गर्भपात प्रकरण : आणखी दोन परिचारिकांना अटक, आरोपींची संख्या झाली ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:40 PM2022-01-13T17:40:56+5:302022-01-13T18:00:36+5:30
वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. तर, त्यानंतर पोलिसांनी असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
वर्धा : येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्या रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणात महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. तर आता आणखी दोन दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे.
स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा ३० हजारात गर्भपात केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती. बुधवारी सकाळी कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता भ्रूण अवशेष आणि काही हाडे आणि गर्भपिशवी आढळून आली होती. बुधवारी पुन्हा डॉ. कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. रेखा कदम हिची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी दिली.
दरम्यान, १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पीडितेचा ३० हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात असलेल्या नामांकित मॅटर्निटी होमच्या डॉ. रेखा कदम यांच्यासह एकूण तिघा जणांना या प्रकरणी आर्वी पोलिसांनी अटक केली होती.