वर्धा गर्भपात प्रकरण; गर्भपात करायचा का, चलो आर्वी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:20 AM2022-01-16T07:20:00+5:302022-01-16T07:20:02+5:30

Wardha News मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती आता काही जण सांगत आहेत.

Wardha abortion case; want to abort, come on Arvi! | वर्धा गर्भपात प्रकरण; गर्भपात करायचा का, चलो आर्वी !

वर्धा गर्भपात प्रकरण; गर्भपात करायचा का, चलो आर्वी !

googlenewsNext
ठळक मुद्देअनैतिक संबंध असो, प्रेम संबंध की, बलात्कारगर्भपातासाठी आर्वीकडे धाव

नरेश डोंगरे

नागपूर : अनैतिक संबंध असो, प्रेम संबंध असो की, कुणी कुणावर केलेला बलात्कार असो. त्यातून कुण्या महिला, मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती आता काही जण सांगत आहेत.

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आर्वीतील डॉ. रेखा कदम आणि त्यांच्या साथीदाराच्या पापाचे खोदकाम पोलिसांनी सुरू केले आहे. ‘लोकमत’ने या संबंधाने विस्तृत माहिती प्रकाशित करून हे प्रकरण जनतेच्या न्यायालयात आणल्यामुळे आता पोलीस यंत्रणेसोबतच आरोग्य यंत्रणेचेही लक्ष याकडे लागले गेले आहे.

या पार्श्वभूमीवर गोपनीयता बाळगून कसून तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. अत्यंत संवेदनशील अशा या प्रकरणाचे अंधारात असलेले अनेक पैलू उजेडात आणण्यासाठी लोकमतने अनेकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला आहे. उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. मात्र, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी खासगीत बोलताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे.

त्यानुसार, कुणाच्या वासनेला बळी पडणाऱ्या पीडित महिला, मुलीचा गर्भपात डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये बिनबोभाट केला जात होता. प्रेम संबंध असो किंवा अनैतिक संबंध ठेवणारे आरोपी महिला किंवा पीडित मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर सरळ या हॉस्पिटलमध्ये पाठवीत होते. तेथे रेखा कदम आरोग्य यंत्रणेत असलेल्या काही मंडळीची साथ असल्याने संबंधित महिला, मुलींचा गर्भपात करून घेत होत्या. गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन सरकारी दवाखान्यातून कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचत होती. सरकारी सेवेत असलेल्या मंडळींकडून अशाप्रकारे भक्कम साथ मिळत असल्याने गर्भवती महिला, मुलींच्या भावना चिरडून त्यांचा आवाज दाबला जात होता.

वर्षभरात व्हायचे शंभरावर गर्भपात

आर्वी हे गाव वजा छोटे शहर जिल्हा मुख्यालय वर्धा येथून सव्वा तासाच्या अंतरावर आहे. तेवढ्याच अंतरावर अमरावती शहरही आहे. आर्वीतून नागपूरला पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. आर्वीच्या तुलनेत वर्ध्यात चांगल्या सुविधा असलेले हॉस्पिटल्स आहेत. त्याहीपेक्षा अद्ययावत आरोग्य सुविधा अमरावती आणि नागपूरच्या हॉस्पिटल्समध्ये मिळतात. असे असताना आडवळणाला असलेल्या आर्वीमध्ये जाऊन गर्भपात करून घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. महिन्याला ५ ते १० तर वर्षभरात ७० ते १०० गर्भपात आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये होत होते, अशीही माहिती आता अनेक जण सांगत आहेत.

कदमांच्या घरीच पापाचा खड्डा

गर्भपातानंतरचे वेस्टेज नष्ट करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यासाठी सरकारचे अटी, नियमही आहेत. डॉ. कदम यांनी मात्र त्या नियमांची ऐशीतैशी करत घरीच पापाचा खड्डा खोदला होता. या खड्ड्यात ते पीडित महिला, मुलींच्या चिरडलेल्या भावना फेकून देत होते.

राजकीय चुप्पीबद्दल आश्चर्य

छोट्या छोट्या प्रकरणात मोर्चे, धरणे, आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांनी या खळबळजनक तेवढ्याच संतापजनक प्रकरणात चुप्पी साधली आहे. आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने असा आक्रमक पवित्रा घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्यही वाटत आहे. यासंबंधाने उलटसुलट चर्चाही केली जात आहे.

धक्कादायक घडामोडींची शक्यता

या प्रकरणात आणखी काही जणांना लवकरच अटक होऊ शकते. त्यांच्याकडून खळबळजनक खुलासे होऊ शकतात आणि कदम यांच्या पापात सहभागी असलेल्यांचीही नावे पुढे येऊ शकतात, असे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

Web Title: Wardha abortion case; want to abort, come on Arvi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.