अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पेट्राेल टाकून जाळण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 12:31 PM2022-11-21T12:31:24+5:302022-11-21T12:36:37+5:30
घटनेने खळबळ : आरोपीचा शोध सुरू
अल्लीपूर (वर्धा) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून न बोलल्यास पेट्राेल टाकून जिवंत जाळण्याची धमकीच नराधमाने दिली. ही घटना अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी नराधमाचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी राहुल चंदू बालबंशी याने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. पीडितेला विश्वासात घेऊन त्याच्या मित्राच्या घरी नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने आरोपीशी बोलणे सोडल्याने आरोपीने पीडितेला मारहाणही केली होती. शनिवारी १९ राेजी पीडिता महाविद्यालयातून घरी जात असताना बसस्थानकावर आरोपी तिला भेटला आणि बोलण्याचा आग्रह करू लागला. पीडितेने बोलण्यास नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ करून पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडितेने थेट अल्लीपूर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.