वर्धा आगाराची बससेवा दहा तास ठप्प

By Admin | Published: March 23, 2017 12:40 AM2017-03-23T00:40:21+5:302017-03-23T00:40:21+5:30

बस थांबवून ठेवण्याच्या कारणातून चालकास मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कानगाव नजीकच्या गाडेगाव येथे घडली.

Wardha Agra bus service stops for ten hours | वर्धा आगाराची बससेवा दहा तास ठप्प

वर्धा आगाराची बससेवा दहा तास ठप्प

googlenewsNext


चालकाला मारहाणीचा निषेध : आरोपीला अटक करण्याची वाहक-चालकांची मागणी

वर्धा : बस थांबवून ठेवण्याच्या कारणातून चालकास मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कानगाव नजीकच्या गाडेगाव येथे घडली. या घटनेचा निषेध नोंदवित बुधवारी पहाटे ५ वाजतापासूनच चालक, वाहक व रापमच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. परिणामी, तब्बल दहा तास बससेवा ठप्प होती. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. दुपारी ३.३० वाजता रापम अधिकाऱ्यांची यशस्वी मध्यस्थी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वर्धा आगारात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संपाची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर पोलीस ताफ्यासह दाखल झाले. शिवाय अल्लीपूरचे ठाणेदार भानुदास पिदुरकरही कर्मचाऱ्यांसह पोहोचले. पोलिसांच्या उपस्थितीत विभागीय नियंत्रकांकडून यंत्र अभियंता, विभागीय वाहतूक अधिकारी सुतवणे, विभागीय सांखिकी अधिकारी देवपुजारी, विभागीय वाहतूक अधीक्षक वाडीभस्मे, वर्धा आगार व्यवस्थापक वाय. एम. राठोड तथा सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा कर्मचारी यांच्यात चर्चा झाली; पण आरोपीला अटक करण्याच्या मागणीवर कर्मचारी अडल्याने ३ वाजेपर्यंत तोडगा निघाला नाही. परिणामी, बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसेसचा अभाव होता. दुपारी ३.३० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मंगळवारी वर्धा ते गाडेगाव बस क्र. एमएच ४० वाय ५३६८ ही गाडेगाव येथे पोहोचली. या बसवर चालक रामचंद्र उईके व वाहक लक्ष्मण तडसे हे होते. बसमध्ये एक नातलग असून त्यांचे काही साहित्य घरी राहिले, असे सांगत सायंकाळी ५.३० वाजता राजू गिरी याने बस थांबवून ठेवण्यास सांगितले.





बराच वेळ लोटूनही सदर नातलगाचे साहित्य देण्यासाठी गिरी आलेच नाही. यामुळे बस व प्रवाशांना विलंब होत असल्याने चालक उईके यांनी बसचा पुढील प्रवास सुरू केला. दरम्यान, बस गावापाूसन एक किमी अंतरावर पोहोचली असता राजू गिरी व अन्य दोघांनी एका दुचाकीने पोहोचून बस अडविली. यानंतर गिरी यांनी वाद घालत चालक उईके यांना जबर मारहाण केली. या घटनेमुळे चालक व वाहकांमध्ये असंतोष पसरला होता. या प्रकरणी मंगळवारी रात्री अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. उईके यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली; पण अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अचानक संपाचे अस्त्र उगारले. महत् प्रयत्नांनी ३.३० वाजता तोडगा निघाल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)

विद्यार्थी, प्रवाशांना फटका
बसस्थानकावर बसेस उभ्या आहेत; पण चालक, वाहक बस काढत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे; पण आज बसेसच गावांत न पोहोचल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना अन्य वाहनांनी परीक्षा केंद्र गाठावे लागले. ग्रामीण नागरिक व दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गालाही दुसऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागला.

डिझेल भरण्याच्या नावावर बसेस केल्या आगारात जमा
दुपारी १२ वाजता शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, बसस्थानक व्यवस्थापक तथा अन्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समजावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. बसस्थानकावर असलेल्या काही बसेस गंतव्य स्थळी रवाना झाल्या; पण बहुतांश बसेस डिझेल भरण्याच्या नावावर वर्धा आगारात नेऊन उभ्या करण्यात आल्या. शिवाय संपूर्ण कर्मचाऱ्यांनीही आगारात पोहोचून संपात सहभाग घेतला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजय मगर, रापमचे अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण दुपारी ३ वाजेपर्यंत तोडगा निघालेला नव्हता. यामुळे दुपारपर्यंत बससेवा ठप्प झाली होती.

 

Web Title: Wardha Agra bus service stops for ten hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.