Wardha Blast; कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना; मृतांची संख्या ६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:59 AM2018-11-20T09:59:05+5:302018-11-20T10:31:48+5:30
Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. वर्धा स्फोटात जखमी झालेल्या ११ जणांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणला होता. कंत्राटदाराकडून हे काम करुन घेतले जात असते व त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली अशी माहिती आहे.
मृतांमध्ये प्रभाकर वानखेडे, राजकुमार भोवते, विलास पचारे, नारायण पचारे, सर्व रा. सोनेगाव व प्रवीण मुंजेवार रा. केळापूर यांचा समावेश आहे. विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, मनोज मोरे, तसेच दिलीप निमगड़े रा. केलापुर हे जखमी आहेत.
आमदार तडस यांनी दिली घटनास्थळाला भेट
आमदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी या अपघाताबाबत तातडीने उपाययोजनेच्या सूचना जारी केल्या आहेत.
काय आहे घटना?
वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथील देवळी तालुक्यात सोनगावबाई गावाजवळ असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण स्फोट झाले. बॉम्ब निकामी करताना हातातून पेटी खाली पडल्याने हे स्फोट झाल्याचे समजते. यात आतापर्यंत सहाजण ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.