वर्धा बसस्थानकाला ५.५३ कोटी
By admin | Published: June 2, 2017 02:07 AM2017-06-02T02:07:53+5:302017-06-02T02:07:53+5:30
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी,
नकाशालाही मंजुरी : गांधीजींच्या जीवनातील दृश्यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, जुने बसस्थानक अपूरे पडत आहे. पार्किंगची सुविधा नाही, मोजकेच फलाट आहे. यामुळे प्रवाशांसह परिवहनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत वर्धा बसस्थानकाच्या विस्ताराचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. विस्तारासाठी ५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी व नकाशाही मंजूर झाला आहे. यामुळे काही महिन्यांतच वर्धा बसस्थानकाचे रूप पालटणार आहे.
शहरातील रहदारीच्या मार्गावर असलेले वर्धा बसस्थानक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सोयीचे ठरते. बसस्थानकापासून सर्वच बाजारपेठ जवळ आहे. शिवाय शासकीय कार्यालयेही अधिक अंतरावर नाहीत. असे असले तरी सध्याचे बसस्थानक बसेस आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेत अपूरे पडत आहे. यामुळे बसस्थानकाच्या विस्तार व सुशोभिकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. राज्य परिवहन महामंडळ व शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यासाठी ५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाय सेवाग्राम विकास आराखड्यामुळेही वर्धा बसस्थानकावर विविध कामे केली जाणार आहेत.
बसस्थानकावर मुख्य फाटकाजवळ असलेल्या पार्किंगच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रसंग रेखाटणाऱ्या दृश्यांचे पुतळे उभारण्यात येणार आहे. शिवाय बसस्थानकातील फलाटांमध्ये वाढ केली जाणार असून पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी मागील भागातील जागा आता बसेससाठी वापरली जाणार आहे. मागील भागात असलेले जुन्या विभाग नियंत्रक कार्यालयाची इमारत पाडून तेथे ग्रामीण भागासाठी फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या ‘इन’ आणि ‘आऊट’ हे दोन्ही गेट एकमेकांजवळच आहे. विस्तारित बसस्थानकाच्या नकाशामध्ये एक गेट एका कोपऱ्यात हलविण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक खोळंबण्याची समस्या निकाली निघणार आहे. बसस्थानकाच्या भिंतीलगत असलेले आॅटो स्टॅण्ड रेल्वे स्थानकांप्रमाणे भिंतीच्या आत घेण्यात येणार आहे. यासाठी वेगळी जागा देणार असल्याने वाहतुकीला शिस्त लागणार आहे. वर्धा बसस्थानकाच्या विस्ताराचा नवीन नकाशा तयार असून त्याला मान्यता मिळाली आहे. विस्तारित बसस्थानकामुळे प्रवाशांची अडचण दूर होईल.
देवळी बसस्थानकाच्या बांधकामासाठी २.८९ खर्च अपेक्षित
देवळी हे तालुक्याचे स्थळ असून तेथील बसस्थानक मोडकळीस आले आहे. या बसस्थानकाच्या बांधकामाचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. यालाही मंजुरी मिळाली असून २ कोटी ८९ लाख २४ हजार ३१५ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. शिवाय आर्वी आगारातील बसेसच्या पार्किंग जागेचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ६४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठीही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
२०१६-१७ मध्ये पूर्ण झालेली कामे
मागील वर्षी तळेगाव बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली. हिंगणघाट आगारात चालक, वाहक विश्रांती गृहासमोर रोकड व वितरण शाखेचे बांधकाम करण्यात आले. वर्धा आगारात पिण्याच्या पाण्याकरिता भूमिगत टाकीचे बांधकाम करण्यात आले. शिवाय आर्वी येथे नवीन बसस्थानक व प्रसाधन गृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सेवाग्राम येथे बसस्थानकामध्ये कुंपण भिंतीचे काम सुरू आहे. हे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.