वर्धा कार अपघात : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 10:38 AM2022-01-25T10:38:31+5:302022-01-25T11:26:13+5:30

सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. यात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे.

Wardha Car Accident : PM Modi announces two lakh each for next of kin of deceased | वर्धा कार अपघात : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

वर्धा कार अपघात : पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

googlenewsNext

वर्धा :  जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात सात युवक जागीच ठार झाले. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (PMNRF) मदत जाहीर केली आहे.

या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी मराठीत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास ४० फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला. सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.

सर्व मृतक हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे. तसेच अपघातातील एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे व एक विद्यार्थी हा ओडिशाचा होता, अशी माहिती त्यांनी दिली. 

अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री दहा वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या हेतून आपण बाहेर आलो असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळवलं होतं. फोनवरुन सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलं होतं. रात्री दहा वाजता हॉस्टेल विद्यार्थी न आल्यामुळे हॉस्टेलमधील वरिष्ठांनाही काळजी लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्यानं सर्वच चिंतित होते. अखेर पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यू बातमी येऊन धडकल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १ 
प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २
शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २
पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १

Web Title: Wardha Car Accident : PM Modi announces two lakh each for next of kin of deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.