वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:13 AM2018-06-22T10:13:12+5:302018-06-22T10:13:20+5:30

विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Wardha citizens will choose city bird; Election for city bird in Vidarbha for the first time | वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक

वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक

Next
ठळक मुद्दे बहार व वर्धा नगर परिषदेचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगणात पाच पक्षी उमेदवार असून निवडणूक मुख्यत्वे आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
वर्धा नगरीचा शहरपक्षी (सिटी बर्ड) निश्चित करण्यासाठी पाच पक्ष्यांमधून निवडून आलेल्या पक्ष्याला शहरपक्षी घोषित केले जाणार आहे. अशाप्रकारे पक्ष्यांची निवडणूक कोकणातील सावंतवाडी येथे प्रथम २०१७ मध्ये घेण्यात आली होती. वर्धा शहरपक्षी निवडणूक ही महाराष्ट्रातील दुसरी व विदर्भातील पहिली निवडणूक ठरणार आहे. वर्धा नगरवासियांना पक्षी जीवनाची ओळख व्हावी, शहराची पक्षीप्रेमी व पर्यावरणस्नेही ही ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित आहे.
या निवडणुकीकरिता वर्धा शहर परिसरात आढळणारा तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय निलपंख व कापशी घार असे पाच पक्षी उमेदवार ठरविले आहे. यातून आॅनलाईन पद्धतीने शहरपक्षी निवडायचा आहे. यासाठी एक गुगल लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या लिंकवर क्लिक केल्यास पाच पक्षी उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका उपलब्ध होईल. शिवाय, शहरातील न.प. व बहार कार्यालय, ‘डिझायनो’ जेल रोड, महावीर उद्यान, बजाज वाचनालय येथे मतदान केंद्र (बुथ) राहील. छापील मतपत्रिकेद्वारे तेथे मतदान करता येईल. एका फिरत्या मतदान केंद्राचाही वापर करण्यात येणार आहे.
निवडणूक कालावधी २३ जून ते १५ आॅगस्ट राहणार असून सर्व वयोगटातील शहर वासियांना मतदान करता येईल. ९ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. मतदान जागृतीकरिता तथा शाळा कॉलेजच्या युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी बहार नेचर फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून निसर्ग अभ्यासक डॉ. तारक काटे, डॉ. गोपाल पालीवाल व प्रा. अतुल शर्मा काम पाहणार आहेत. शहरातील नागरिकांनी या अनोख्या निवडणुकीत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन बहार नेचर फाउंडेशन तसेच नगर परिषदेद्वारे करण्यात आले आहे.

हे पक्षी आहेत उमेदवार
तांबट - कॉपरस्मीथ बार्बेट, पांढऱ्या छातीचा धीवर - व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, ठिपकेवाला पिंगळा - स्पॉटेड आऊलेट,भारतीय नीलपंख - इंडियन रोलर, कापशी घार - ब्लॅकशोल्डर काईट

निवडणूक प्रक्रिया अशी आहे
आॅनलाईन निवडणुकीकरिता वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्यावर क्लीक केल्यास मतपत्रिका उपलब्ध होईल. मतपत्रिकेवर पाच पक्षीउमेदवारांची मराठी व इंग्रजी नावे दिलेली आहे. पाचपैकी एकाच पक्ष्याला मतदान करता येईल. त्यानंतर मतदान करणाऱ्याने स्वत:चे नाव व गाव लिहावे आणि हा फार्म सबमिट करावा.
विदर्भातील वर्धा शहरात पहिल्यांदा नागरी पक्षी ठरविण्याकरिता निवडणूक होत आहे, याचा आनंद आहे. मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मतदान केंद्र राहील. तसेच फिरते मतदान केंद्रही राहील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शहरपक्षी निवडावा. निवडलेला पक्षी चित्र व शिल्पाच्या रूपात वर्धानगरीत महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, वर्धा.

माणसांची जीवनशैली निसर्गापासून दूर जाणारी आहे. निसर्गाशी शत्रुत्व पत्करून नव्हे तर मैत्री करूनच मानवाला विकास साध्य करावा लागेल. वर्धा शहरपक्षी निवडणूक हे त्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. विद्यार्थी, नागरिकांना निसर्ग वाचायला शिकविणे, निसर्गाशी मैत्री करावी ही जाणीव निर्माण करणे, ही ताकद या उपक्रमात आहे. आपण भरभरून मतदान करा. अवतीभोवतीचे पक्षी पहा. निसर्ग वाचा. या उपक्रमात सहभागी व्हा. निसर्गमित्र बना.
- प्रा. किशोर वानखडे, अध्यक्ष, बहार नेचर फाऊंडेशन, वर्धा.

Web Title: Wardha citizens will choose city bird; Election for city bird in Vidarbha for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.