१४ ठिकाणांहून होणार वर्धा शहर नजरकैद
By admin | Published: February 7, 2017 01:09 AM2017-02-07T01:09:15+5:302017-02-07T01:09:15+5:30
शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
नवे खांब, नवी कंट्रोल रूम : १५ दिवसात होणार काम पूर्ण
वर्धा : शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते औटघकेचे ठरले. यामुळे नवे कॅमेरे लावण्याचा निर्णय झाला. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून १ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले. त्याचे टेंडरींग होवून कामाला प्रारंभ झाला आहे. मिळालेल्या रकमेत शहरातील १४ ठिकाणी तब्बल ४८ कॅमेरे लागणार आहेत. काम पूर्णत्वास जात असून या कॅमेऱ्यातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पूर्वी शहरात असलेल्या वाहतूक नियंत्रक दिवे असलेल्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र गत काही दिवसांपासून शहरातील सिग्नल बंद असल्याने लाल, हिरव्या आणि पिवळ्या दिव्यांसह त्यांचे खांबही बेपत्ता झाले आहेत. यामुळे कॅमेरे लावण्याकरिता निवड झालेल्या चौकाचा सर्व्हे करून जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर नवे खांब उभारून त्यावर लाभ होणाऱ्या दिशेने कॅमेरे लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यात त्या भागात होणाऱ्या सर्वच हालचाली कैद होणार आहे.
शहरात हे कॅमेरे लावण्याचा कंत्राट मुंबई येथील एका कंपनीला दिला आहे. कॅमेरे लावण्याचे काम ९० दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिलेल्या कालावधीनुसार काम पूर्णत्त्वास येत असून येत्या १५ दिवसांत हे कॅमेरे शहरातील प्रत्येक हालचाली टिपणार आहेत. या हालाचाली थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कैद होणार आहे. त्याकरिता एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येत आहे. या कक्षातून हे कॅमेरे हँडलिंग होणार आहेत.(प्रतिनिधी)
नव्या नियमामुळे हिंगणघाट येथील काम रखडले
वर्धेप्रमाणे हिंगणघाट शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार होते. तसा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र या संदर्भात शासनाने काही नव्या सूचना जारी केल्याने ते काम रखडले आहे. आता नव्या निर्देशानुसार प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कार्यालयातून नियंत्रण
शहरात लावण्यात येणार असलेल्या कॅमेऱ्यांची व्यवस्था त्यातील महत्त्वाची चित्रे गोळा करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालात विशेष कक्ष सुरू करण्यात येत आहे. त्याचे कामही पूर्णत्त्वास येत आहे.
३० लाखांचे टेंडरिंग बाकी
वर्धा शहरात कॅमेरे लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने १ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले होते. यातील १ कोटी रुपयांचे टेंडरींग झाले असून ३० लाख रुपयांचे टेंडरींग बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ३० लाख रुपयांचा विचार करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे.
शहरात सुरू होणाऱ्या सीसीटीव्हीचे काम प्रगतिपथावर आहे. कॅमेरे लावण्याचे काम मुंबई येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यानुसार त्याच्याकडून काम सुरू असून ते येत्या १५ दिवसात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कॅमेरे हँडलींग करण्याकरिता एसपी कार्यालयात एक अद्ययावत कंट्रोल रूम तयार करण्यात येत आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक़