सतर्कतेचे गिरवून धडे, सायबर चोरांच्या राहा पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 01:50 PM2022-02-07T13:50:28+5:302022-02-07T14:00:27+5:30
‘जागरुकता आणि सतर्कतेचे गिरवून धडे, राहा सायबर गुन्हेगारांच्या पुढे’ असे आवाहन पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकाचौकांत केले जात आहे.
वर्धा : वाढत्या डिजिटल व्यवहाराबरोबरच सायबर गुन्हेगार चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ही सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात टि्वटर, फेसबुक, व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सजग करण्याचे काम वर्धा पोलिसांनी हाती घेतले आहे.
‘जागरुकता आणि सतर्कतेचे गिरवून धडे, राहा सायबर गुन्हेगारांच्या पुढे’ असे आवाहन पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकाचौकांत केले जात आहे. फसवणूक झालेली रक्कम परत करण्यासाठी गोल्डन अवर महत्त्वाचा ठरतो. सायबर गुन्हेगारांद्वारा फसवणूक केली जात असताना सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन अवरचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्वप्रथम सायबर सेलशी संपर्क करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप करा, नंतर एफआयआरची औपचारिकता पूर्ण करा, लँडलाईन नंबर ईमेलद्वारा तक्रारीची स्थिती जाणा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
गुन्हा घडल्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधल्यास अशा गुन्ह्यात पैसे मिळण्याचा रिकव्हरी रेट ३५ टक्के असतो. तक्रार द्यायला उशीर झाल्यास त्याचे प्रमाण केवळ १० टक्के असल्याचे सायबर पोलीस सांगतात. सायबर पोलिसांकडे मागील वर्षभरात विविध माध्यमातून फसवणुकीच्या तब्बल ४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत हे विशेष.
सायबर पोलिसांचा जनजागृतीपर संदेश
- तुमच्या बँक खात्यात पैसे टाकले आहेत, अशा लिंकला क्लिक करु नका.
- फेसबुक बनलंय प्रत्येकाच्या गळ्यातील टाईत, फेक अकाउंटचा बळी जाल मित्र जोडण्याच्या घाईत.
- खासगी गोष्टी सोशल करु नका, सेक्सटॉर्शनच्या हनी ट्रॅपमध्ये अडकू नका.
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण
सायबर गुन्हेगारी ऑनलाईन बँकिंग, कार्ड फ्रॉडचे प्रमाण ३५ टक्के, सोशल नेटवर्किंग संबंधित २० टक्के, ऑनलाईन बिझनेस २२ टक्के, हॅकिंगसंबंधित ३ टक्के, तर मोबाईल संबंधित तसेच इतर गुन्हे ४ टक्के आहे.
काय आहे गोल्डन अवर...
गोल्डन अवर म्हणजे असा कार्यकाळ असतो, ज्यात गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते. सायबर पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर स्टॉप पेमेंट सूचना विविध पेमेंट करणाऱ्या कंपनीच्या पॅन इंडिया नोडल अधिकाऱ्यांना ताबडतोब पाठवली जाते. तुमची तक्रार पोलिसांच्या करण्यात आलेल्या हॅकिंग, डाटा चोरी, ऑनलाईन उद्योग, फसवणूक, सोशल नेटवर्क, एटीएम कार्ड या पाच युनिटपैकी एकाकडे पाठविली जाते.