प्रभावी उपाययोजनांमुळेच वर्धा ‘कोरोनामुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:16+5:30

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या.

Wardha 'Coronamukta' only due to effective measures | प्रभावी उपाययोजनांमुळेच वर्धा ‘कोरोनामुक्त’

प्रभावी उपाययोजनांमुळेच वर्धा ‘कोरोनामुक्त’

googlenewsNext
ठळक मुद्देसाथरोग नियंत्रण कक्ष, विशेष पथक, चेकपोस्ट, नियमित सर्वेक्षण, आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच वर्धा कायम शून्य राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रण कक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी आणि गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या. याचे नागरिकांनी पालन केले. चोरमार्गाने येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हीच कोरोनाला रोखण्यात जमेची बाजू ठरली. सर्व विभागांचे सांघिक प्रयत्न व सहकार्याने वर्धा जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.

२४ तास नियंत्रण कक्ष, माहिती अद्ययावत करण्याचे काम
जिल्हास्तरावर २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापन करून जिल्हाधिकारी, व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा खोब्रागडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदीप नखाते, जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. विनीत झलके, डॉ. अनुजा बारापात्रे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ तेलतुंबडे, आरोग्य सहाय्यक जवाहर सेलोकर, मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी, नारायण जवादे, डीईओ (आयडीएसपी) यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
या कक्षामार्फत जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरून देशातून आलेले तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांशी तत्काळ संपर्क साधून लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन सर्व माहिती अद्ययावत करण्याचे कार्य नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांची तपासणी करण्यास्तव जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर व प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता थर्मल स्कॅनिंग गन पुरविण्यात आल्या. त्यामार्फत चेकपोस्टवर येणाºया नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दररोज रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हॅपी हायपोक्सीयाची प्राथमिक लक्षणे शोधून काढण्यास्तव प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये पल्स ऑक्झीमीटरद्वारेसुद्धा तपासणी करण्यात येत आहे.

सीमेवरील चेकपोस्टवर तपासणी
जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या असून सर्व सीमाभागात एकूण १६ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांची नोंद घेण्यात आली व अशा लोकांना गृहविलगीकरण करण्यात आले. प्रत्येकाची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात आली.

मजुरांची तपासणी
कामाकरिता वर्धा जिल्ह्यात आलेल्या मजुरांची नोंदणी करून त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आर.बी.एस.के व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नियमित तपासणी करण्यात आली. विविध ५९ निवाºयांमध्ये असलेल्या आजपर्यंत जवळपास ८४१२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.

खाकीतील कोरोना योद्यांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यातील एकूण १६ चेकपोस्ट वर कार्यरत तसेच संपूर्ण जिल्ह्यामधील कार्यरत पोलीस विभागातील एकूण २२०० कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय अधिकारी तसेच आयएमएचे डॉक्टरांमार्फत करण्यात आली व समुपदेशन तसेच किरकोळ आजारांवर उपचार करण्यात येत आहे.

गावपातळीवर सर्वेक्षण
आरोग्य विभागामार्फत प्रत्येक शहर व गांव पातळीवर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत दैनंदिन प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एसएआरआय व आयएलआय या सारखी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची दैनंदिन माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परदेशातून आलेल्या ११४ तसेच परजिल्ह्यातून १९९१० नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करून लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण ११५३ एवढी पथके तयार करण्यात आलेली असून त्यांची जबाबदारी तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र यांना सोपविण्यात आलेली आहे.

सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे व नियोजन केल्यामुळे कोरोनाचा सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे. मात्र, नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरून जाऊ नये, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे व शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यापुढे सुद्धा टाळता येईल. प्रतिबंध हाच उपचार असून सर्व नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Wardha 'Coronamukta' only due to effective measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.