coronavirus; वर्ध्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:27 PM2020-06-24T13:27:39+5:302020-06-24T13:28:53+5:30
प्रशासनाच्या व्यापक उपाययोजनांमुळे वर्धा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतरही वर्धा जिल्हा सुरुवातीच्या दीड महिन्यांपर्यंत ग्रीन झोनमध्ये राहिला. पण, एका मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली. सध्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ११ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. प्रशासनाच्या व्यापक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या आणि शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियम व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनही अॅक्टिव्ह मोडवर काम करीत असल्याने नागरिकांमध्ये कारवाईचा धाक कायम आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रशासन मास्कचा वापर, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवर काम करीत आहे. जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे आतापावेतो १३ रुग्ण सापडले. यापैकी एका रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आणि इतर ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एका रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे होण्याचा वर्धा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्के आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ३६ टक्के तर देशाच्या दरापेक्षा २९ टक्के अधिक आहे.