Wardha: नदीत आढळला बिबट्याचा मृतदेह, हिंगणी वनपरिक्षेत्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 19:48 IST2023-11-17T19:48:15+5:302023-11-17T19:48:39+5:30
Wardha: सेलू तालुक्यातील हिंगणी वनपरिक्षेत्रातील वडगाव (खुर्द) शिवारात बिबट्याच्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून आज सकाळी बिबट्याचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आला.

Wardha: नदीत आढळला बिबट्याचा मृतदेह, हिंगणी वनपरिक्षेत्रातील घटना
- आनंद इंगोले
वर्धा - सेलू तालुक्यातील हिंगणी वनपरिक्षेत्रातील वडगाव (खुर्द) शिवारात बिबट्याच्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून आज सकाळी बिबट्याचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
हिंगणी वनपरिक्षेत्रातील वडगाव (खुर्द) शिवारातील नदीपात्रात बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आगासे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठून परिसरात वनकर्मचाºयांची गस्त लावली. आज सकाळी बिबट्याच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. आजुबाजुला दाट जंगल असल्याने तेथे शवविच्छेदन करणे शक्य नव्हते.
त्यामुळे मृतदेह हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणला. तेथे शवविच्छेदन करुन विसेरा तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. हा बिबट्या जवळपास ८ ते ९ महिन्यांचा असल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर कार्यालयाच्या परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वन्यजीव उपवनसंरक्षक गजानन बोबडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकारी आगासे व त्यांचे सहकारी कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम व त्यांची चमू उपस्थित होती.