अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास सश्रम कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By महेश सायखेडे | Published: September 14, 2022 07:18 PM2022-09-14T19:18:36+5:302022-09-14T19:19:36+5:30
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा छळ करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल सश्रम कारावास ठोठावला आहे.
वर्धा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देण्याऱ्या आरोपीस दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१, व्हि. टि. सूर्यवंशी यांनी दिला. कमलेश गोपाल पिंपळकर (३०) रा. बुरड मोहल्ला वर्धा असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपी कमलेश पिंपळकर याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या कारावास, भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत दोन वर्षाच्या सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कारावसाची शिक्षा ठोठावली.
पीडिता ही वर्धा शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत असताना पीडितेच्या मैत्रिनीने पीडितेची आरोपी सोबत ओळख करून दिली. त्यानंतर आरोपी हा वारंवार पीडितेचा पाठलाग करीत होता. एके दिवशी पीडिता ही तिच्या घरी छतावर उभी असताना आरोपी हा तिच्या घराच्या मागून छतावर चढून आला. त्यामुळे पीडिता ही घरात पळून गेली. पण आरोपी पीडितेच्या मागे तिच्या घरात शिरला. तिथे त्याने पीडितेसह तिच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पण आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. ही घटना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीत यांनी तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
पाच साक्षदारांची तपासली साक्ष
या प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून देवेंद्र कडु व सुजीत पांडव यांनी काम पाहिले. याप्रकरणी न्यायालयात पाच साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आपला निकाल दिला.
भीतीपोटी प्राशन केले मॉर्टीन
सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर काही दिवसांनी पीडिता ही कॉलेजमध्ये असताना आरोपी येथे आला. त्याने पीडितेच्या मैत्रिणीला फोन करून पीडितेशी संवाद साधला. तु कॉलेजबाहेर ये नाही तर मी कॉलेजमध्ये येतो अशी दमदाटी करून आरोपीने पीडितेला कॉलेजबाहेर बोलविले. त्यानंतर त्याने पीडितेस दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला. पीडिताने नकार देताच आरोपीने पीडितेचा हात व डोक्याचे केस ओढून तिला गाडीवर बसण्यास जबरदस्ती केली. अशातच आरोपीच्या भितीमुळे पीडित ही तिच्या दप्तरात मॉर्टिन ठेवत होती. शिवाय घटनेच्या दिवशी आरोपीच्या त्रासाला वैतागून तिने ते सेवन केले. ही बाब लक्षात आल्यावर आणि पीडितेने उलटी करताच आरोपी हा तेथून निघून गेला.
शिक्षकालाही केली होती मारहाण
संबंधित घटनेच्या पूर्वी कॉलेज मधील एका शिक्षकाने आरोपीला मुलीला का छेडतो असे म्हटले असता त्याने शिक्षकालाही मारहाण केली होती. त्यामुळे कॉलेजच्या प्राचार्यांनी पीडितेच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. पीडिताने आरोपीच्या भितीमुळे घडलेल्या घटना घरी सांगितल्या नव्हत्या. पण प्राचार्यांनी हिम्मत दिल्याने पीडितेचे मनोधैर्य वाढले आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले होते.