Corona Virus in Wardha; बालाघाटला निघालेल्या ३४ कामगारांना वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 07:19 PM2020-03-29T19:19:49+5:302020-03-29T19:20:09+5:30
आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा:- आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले. तसेच उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
उमरी मेघे येथील हर्षनील अॅग्रो इंडस्ट्री आहे. येथे ३४ कामगार काम करतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरी जायचे होते. हे कामगार भर उन्हात आज बालाघाटकडे पायी प्रवासाला निघाले होते. जिल्हाधिकारी आर्वीचा दौरा आटोपून परत येत असताना त्यांना उमरी मेघे येथे हे मजूर भरदुपारी पायी जाताना दिसले. त्यांनी लगेच गाडी थांबवून मजुरांची विचारपूस केली. 300 किलोमीटरचा पायी प्रवास करणे अवघड आहे. देशात लॉक डाऊन असल्यामुळे खाण्या पिण्याचे आणि राहण्याची सोय रस्त्यात कुठेही होणार नाही. रस्त्यात तुम्ही आजारी पडलात तर दवाखाने कुठे शोधणार. आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था करू. हे सर्व संपले की तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. तुम्ही संगीत वाजवा, गाणे म्हणा, खेळा तुम्हाला हवं ते करा आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो असे समजावून सांगितल्यावर मजूर थांबायला तयार झाले.
वर्धा तहसीलदार प्रीती डुडुलकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन मालकाशी चर्चा केली. ते पगार द्यायला तयार असूनही कामगारांना त्यांच्या गावी जायचे होते. अशा परिस्थितीत एवढा प्रवास करून जाणे धोकादायक असल्याचे त्यांना समजावून सांगितले आणि तिथेच थांबविण्यात आले. उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच प्रशासनाने त्यांना शिधासुद्धा उपलब्ध करून दिला आहे.