वर्धा जिल्ह्यात पॉस मशीनमधील त्रुटींमुळे स्वस्त धान्याचे लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:14 PM2018-04-18T14:14:35+5:302018-04-18T14:14:48+5:30
घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.
विजय माहुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.
आधार कार्ड क्रमांक दाबताच काही व्यक्तींच्या नावात बदल झाल्या कारणाखातर तर काहीचे अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना माघारी फिरत परतावे लागत आहे
या चुकांच्या दुरुस्तीसाठी या शिधापत्रिकाधारकास तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. या मशीनवर नोंद करण्यासाठी लागणारा वेळ पाहता संपूर्ण दिवस वाया घालवावा लागत आहे. शासनाने खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळावे म्हणून सुविधा केली असली तरी ग्राहकांची मात्र डोकेदुखी वाढविली आहे
त्यातच काही महिन्यांपूर्वी शिधा पत्रिका असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी एका पत्रिकेऐवजी निरनिराळ््या शिधापत्रिका बनविल्या. अशा नवीन शिधा पत्रिकाधारकांना गत ८/१० महिन्यांपासून धान्य मिळत नाही. त्या नवीन शिधा पत्रिका तहसील कार्यालयातून लिंक करण्यात आल्या नसल्याचे कारण सांगितले जात आहे ही समस्या कोणत्या एका गावापुरती नसून संपूर्ण तालुक्यात असल्याने अनेक परिवार स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत.
पॉसमशीनची परिपूर्ण माहिती नसल्याने ग्राहकांचा वेळही वाया जातो आहे. या समस्येवर तातडीने दुसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे मत नागरिकांत व्यक्त केले जात आहे.