लम्पी आजारामुळे नागपूर विभागात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू वर्धा जिल्ह्यात
By आनंद इंगोले | Published: November 24, 2022 11:00 AM2022-11-24T11:00:56+5:302022-11-24T11:05:29+5:30
गोपालकांची वाढली अडचण; पशुसंवर्धन विभागातील अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या
वर्धा : जिल्ह्याच्या सीमेवरील इतर जिल्ह्यांत लम्पी आजाराचा प्रकोप वाढत असल्याचे निदर्शनास येताच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्याने जिल्ह्यात उशिराने या आजाराचा शिरकाव झाला. मात्र, त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने ‘ऑल इज वेल’ असल्याचे चित्र वरिष्ठांसमोर उभे केल्याने वर्धा जिल्ह्यात लम्पीचा विस्फोट झाल्याचे वास्तव खुद्द पशुसंवर्धनच्या आकडेवारीवरूनच दिसून येत आहे. नागपूर विभागात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात आता लम्पीने भर घातली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आजार जिल्ह्याच्या सीमेवर येताच गावोगावी उपाययोजना सुरू केल्या. परिणामी जिल्ह्यात उशिराने आर्वी व आष्टी तालुक्यातून लम्पीची एन्ट्री झाली. लम्पीबाधित जनावरे आढळून आल्याबरोबर दोन्ही अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बाधित गावाला भेट देऊन तातडीने उपचार सुरू केले. दरम्यानच्या काळात डॉ. सचिन ओम्बासे यांची बदली झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या आजाराबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. कागदोपत्री कार्यवाही करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचाच प्रकार चालविला. परिणामी जिल्ह्यातील तब्बल १२८ गोवंश या आजाराला बळी पडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्यासह एकंदरीतच पशुसंवर्धन विभागात सुरू असलेला सावळागोंधळ ‘लोकमत’ने सातत्याने निदर्शनास आणून दिला; परंतु या विभागातील उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकाराबाबत वरिष्ठांनी ना दखल घेतली ना नोटीस बजावली.
नागपूर विभागातील आकडेवारी (२१ नोव्हेंबरपर्यंत)
जिल्हा - तालुके - बाधित - आजारमुक्त - ॲक्टिव्ह - मृत्यू
- नागपूर - १३ - २८०७ - २०२२ - ७८५ - ११९
- चंद्रपूर - १५ - ४५१ - ३३१ - १२० - ०६
- वर्धा - ०८ - १६६५ - ११३७ - ५२८ - १२८
- गोंदिया - ०८ - १९८ - १४२ - ५६ - ०७
- भंडारा - ०७ - ७९४ - ३२९ - ४६५ - ६७
- गडचिरोली - १२ - ०५ - ०० - ०४ - ०१
जिल्ह्यातील जनावरांची मृत्यूसंख्या
तालुका - मृत्यू
आर्वी - १९
आष्टी - ४७
कारंजा - २०
हिंगणघाट - ०९
समुद्रपूर - ०३
देवळी - ०६
वर्धा - १८
सेलू - ०७
वीस दिवसांत मृत्यूचा आकडा तिप्पट
जिल्हा पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश काढून स्वत:च या आदेशाचे पालन केले नाही. परिणामी तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनीही त्यांचाच कित्ता गिरविल्याने जिल्ह्यात लम्पी आजार झपाट्याने वाढला. कागदोपत्री घोडे नाचविण्यात आणि जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानल्याने लसीकरणानंतही अवघ्या वीस दिवसांत जनावरांच्या मृत्यूचा आकडा तिप्पट झाला. १ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १०४ बाधित गावांमध्ये ३३ जनावरे दगावली होती. आता मृत्यूची संख्या १२८ झाली असून, याची नोंदही पशुसंवर्धन विभागाकडे आहे.
सहा अधिकारी पाठविले परजिल्ह्यात
जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांती कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात लम्पीचा प्रकोप वाढत असताना, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना, सहा अधिकारी परजिल्ह्यात सेवा देण्याकरिता पाठविले. परिणामी वर्धा जिल्ह्यातील डोलारा ढासळला आणि जनावरांच्या मृत्यूचा आकडा फुगला. यामुळे आता पशुपालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाला तिजोरी खाली करावी लागणार आहे.