वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हळद काळी पडली तर केळांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:28 PM2020-04-01T16:28:29+5:302020-04-01T16:29:02+5:30
गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पुरुषोत्तम नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गेल्या आठ दिवसापासून तीनचारदा झालेल्या वादळी पावसाने परिसरातील हळदीचे पीक काळे पडून तर केळी तुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्वी तालुक्यात गेल्या चोवीस तारखेपासून वादळी पावसासह अनेक गावात झालेल्या गारा पडल्या. या गारांनी संत्रा, हळद व केळी ही पिके संपविली आहेत. जो काही माल शेतात शिल्लक आहे त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने तो माल कुणीही विकत घेत नाही. या प्रकारामुळे शेतकरी चिंतातूर झालाआहे. मजूर कामावर येण्यास तयार नाहीत, लाखो रुपयांचे नुकसान होऊन भरपाई कुठलीच नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी वर्ग सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात जबरदस्त वादळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संत्रा हळद व केळीसह अन्य पिक उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे संचारबंदी मुळे मजूर कामाला येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा माल संत्रा केळी व हळद शेतात अडकलेला आहे. अशा माल विकत घेण्याकरीता व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे अशा स्थितीत शासनाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी
बाळा जगताप. शेतकरी व प्रहार सोशल फोरम आर्वी