वर्धा जिल्ह्यात सूर्य कोपला; साडेतीन हजार हेक्टरवरील संत्राबागांना झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:45 AM2019-05-09T09:45:01+5:302019-05-09T09:48:33+5:30
वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना झळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा (घाडगे) तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात तीव्रता चांगलीच वाढली आहे. परिणामी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरवरील सत्रा बागा धोक्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी या बागांना वाचविण्याकरिता धडपड सुरु केली आहे.
कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक असून या पिकांवरच शेतकऱ्यांचे आथिक बजेट अवलंबून आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना संपन्नता मिळाली तर परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरीसह कुपनलिकाही कोरड्या झाल्याने संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.
तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना जास्त पाणी लागत असल्याने बागायतदारांनी कुपनलिका केल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बागायतदारांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु आता जलपातळी खालावल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानाने निर्माण झालेली ही दुष्काळी परिस्थिती बागायतदारांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने विहीरी, कुपनलिका कोरड्या पडत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे संत्राबागा वाळालयला लागल्या आहे.
या लाखमोलाच्या बागा वाचविण्याकरिता बागायतदारांनी टँकरव्दारे पाणी विकत घेऊन झाडांना देण्याचा खटाटोप चालविला आहे. पण, या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे दरही १ हजार रुपयाच्या वर गेल्याने विकतचे पाणी देणे बागायतदारांना न परवडणारे आहे. विकतचे पाणी किती दिवस देणार हा प्रश्न पडल्याने संत्रा बागायतदारांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत लाख रुपयाचे उत्पन्न देणारे झाडं डोळ्या देखत वाढत असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अद्यापही उपाययोजना न झाल्याने तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे.
माझ्याकडे सात वर्षाची संत्रा बाग आहे. यावर्षी फळे येतील व केलेला खर्च निघून संसाराला आधार होईल, अशी आशा होती. परंतु दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण बागच पाण्याअभावी वाळून गेली.
-पंकज मानकर, चंदेवाणी
माझ्या शेतावर २०० झाडांची फळबाग आहे. यावर्षी विहीर कोरडी झाल्याने संत्रा बाग वाळत आहे. संत्रा बाग वाचविण्यासाठी लागणारा खर्च कोठून करायचा हा प्रश्नच आहे.
-पंजाबराव इंगळे, बागायदार, चंदेवाणी
संत्रा पिकांवर गेल्या दहावर्षापासून किडीच्या प्रमाणात वाढ होवूनही मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा वाचविल्या. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने बागा डोळयादेखत वाळत आहे. त्यामुळे शासनाने बागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
-रवी पठाडे, बागायतदार, सेलगाव (लवणे)