राज्यात वर्धा जिल्ह्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद ; एकूण दीड लाख प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:12 PM2018-01-01T14:12:01+5:302018-01-01T14:13:21+5:30
२०१६ मध्ये राज्यात महिलांशी संबंधित १ लाख ६५ हजार ३९३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांपैकी सर्वाधिक गुन्हे वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : २०१६ मध्ये राज्यात महिलांशी संबंधित १ लाख ६५ हजार ३९३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांपैकी सर्वाधिक गुन्हे वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी ५३.४७ टक्के प्रकरणाचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे विनयभंगाच्या २०१५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ६१६७ गुन्ह्यांचा तपास अद्यापही प्रलंबित आहे. सदर माहिती अलिकडेच राज्यातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा क्राईम इन महाराष्ट्र २०१६ च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यात महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना गेल्या वर्षात महिलांशी संबंधित कायद्यांन्वये ३१ हजार २७५ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यामध्ये सर्वांधिक ११ हजार ९९६ गुन्हे विनयभंगाचे आहेत. राज्यात गतवर्षी दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी महिलांशी संबंधित गुन्ह्यांची टक्केवारी ११.९५ टक्के आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंगासह अन्य १४ प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण विनयभंगाचे आहे. २०१५-१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये हे प्रमाण २.६८ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ३७ टक्के गुन्हें हे एकट्या विनयभंगाचे आहेत. राज्यात १० पोलीस आयुक्तालय आणि ३६ पोलीस जिल्हा ९ परिक्षेत्रातील ही माहिती असून शहर व ग्रामीण भागातील सर्व भागाचा यात समावेश आहे. २०१४ मध्ये महिलांशी संबंधित एकूण २६ हजार ६९३ गुन्हे दाखल झाले होते. त्यात १० हजार १ गुन्हे विनयभंगाचे होते. तर २०१५ मध्ये ३१ हजार १२६ गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ हजार ७१३ गुन्हे विनयभंगाचे आहेत. २०१६ मध्ये ३१ हजार २७५ गुन्हे दाखल झाले. यामध्ये ११ हजार ३९६ गुन्हे हे विनयभंगाचे आहेत. वर्धा जिल्ह्यात २०१३ मध्ये विनयभंगाच्या २२७ गुन्ह्यांची, २०१४ मध्ये १९२, २०१५ मध्ये २४३, २०१६ मध्ये १५२ तर २०१७ मध्ये नोव्हेंंबर अखेरपर्यंत १६४ गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.