वर्धा जिल्ह्यात शिक्षिकेची विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:25 AM2018-08-31T11:25:42+5:302018-08-31T11:29:44+5:30
हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी २८ आॅगस्टला केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या घटनेची नोंद अदखलपात्र गुन्हा अशी घेतली आहे.
सदर विद्यार्थिनी व तिची मैत्रीण वर्ग सुरु असताना लघुशंकेसाठी गेल्या व परत आल्या. मात्र वर्ग सुरू असताना बाहेर पडण्याच्या त्यांच्या कृतीमुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने या दोघींपैकी एकाला दमदाटी केली तर दुसरीचे केस ओढून तिला आपटले व मारहाण केली. शाळा सुटल्यावर मुलीला घेण्यासाठी आलेल्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी संबंधित शिक्षिकेकडे विचारणा केली. त्यावर हे प्रकरण इथेच मिटवा अन्यथा मुलीचे पुढचे शिक्षण अडचणीत येईल अशी भाषा वापरली. त्यावर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित शिक्षिका व पर्यवेक्षक यांची चौकशी केली जाईल. त्या शिक्षिकेने आपले म्हणणे लेखी दिले असून त्याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल.
विष्णू इटनकर, मुख्याध्यापक जीबीएमएम हायस्कूल, हिंगणघाट, वर्धा.