वर्धा; ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:59 AM2019-03-25T10:59:21+5:302019-03-25T11:01:20+5:30
मोरांगणा ग्रामपंचायत निवडणूकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डातील एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात विसरून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मोरांगणा ग्रामपंचायत निवडणूकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डातील एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात विसरून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर फोनाफोनी झाली व रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.
येथील ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पङावे म्हणून चार वर्ग खोल्यांमध्ये चार वॉर्डाच्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या. काही वेळाने ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनात बसून अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. मात्र घाईगडबडीत वॉर्ड नं. एकची मशीन घेऊन जायचे विसरले.
गावातील काही मंडळींनी काही राहून तर गेले नाही ना म्हणून वर्ग खोलीत ङोकावून बघितले असता वॉर्ड नं. १ च्या खोलीत ईव्हीएम मशीन आढळून आली. याबाबत हल्लकल्लोळ झाला. काहींनी आमदार अमर काळे यांच्या कानावर तर काहींनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली तेव्हा कुठे रात्री ८:३० वाजता एका वाहनातून एक कर्मचारी आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला.
याबाबत तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मागाहून झोनल मॅनेजर येणार होते व टीमला सोबत नेणार होते. पण नेमकी एकच ईव्हीएम मशीन का ठेवली या प्रश्नाबाबत ते बोलू शकले नाहीत.