वर्धा मुख्यालयाला सर्वसाधारण जेतेपद
By Admin | Published: August 28, 2016 12:32 AM2016-08-28T00:32:15+5:302016-08-28T00:32:15+5:30
जिल्हा पोलीस विभागाच्या गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाने सर्वसाधारण जेतेपद पटकाविले
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता : तीन दिवस विविध खेळ
वर्धा : जिल्हा पोलीस विभागाच्या गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाने सर्वसाधारण जेतेपद पटकाविले. पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी चमू नागपूर येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
यावेळी मंचावर अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक (गृह) रवीं किल्लेकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी पोलीस विभागाकडून मानवंदना देण्यात आली. यानंतर महिला व पुरूषांची १०० मीटर दौड स्पर्धा झाली. यात महिलांमध्ये प्रथम स्थान वर्धा विभागाच्या शाहीन सैयद तर द्वितीय स्थान मुख्यालयाच्या पुजा गिरडकर यांनी पटकावले. पुरूषांमध्ये प्रथम स्थान मुख्यालयाचे योगेश ब्राह्मणे तर द्वितीय स्थान तुषार इंगळे याने पटकावले. स्पर्धेतील बेस्ट अॅथलिट पुरस्कार पुरूष गटात वर्धा विभागाचे सूरज जाधव तर महिला गटात बेस्ट शाहीन सैयद यांना देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकरिता सुद्धा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
राखीव पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर ठवरे यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील चारही उपविभागातील खेळाडूंनी पथसंचलन केले. अध्यक्षीय भाषणात पोलीस अधक्षीक गोयल यांनी सर्व खेळाडूंना समन्वय साधण्यासाठी खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे, असे सांगितले. अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांनी या स्पर्धेत ज्यांना यशाने हुलकावणी दिली त्यांनी खचून न जाता जिद्दीने व नव्या उमेदीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. तसेच पुढे होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील तमाम खेळाडूंनी प्रयत्न करून यशाचे शिखर गाठावे, असे सांगितले.
या कार्यक्रमाला सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धा स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नागपूर परीक्षेत्राचे सहायक टीम मॅनेजर पोलीस उपनिरीक्षक राजेश उमरे, जिल्हा खेळप्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी सहकार्य केले. संचालन डॉ. अजय येते यांनी तर उपस्थितांचे आभार आर.जी. किल्लेकर यांनी मानले.(प्रतिनिधी)