'त्या' १८ अहवालांची वर्धा आरोग्य विभागाला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:00 PM2020-05-12T14:00:19+5:302020-05-12T14:02:08+5:30

सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहे. उर्वरित १८ व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे वर्धा जिल्हा कोविड सेंटर समन्वयक डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली आहे.

Wardha Health Department is waiting for those 18 reports | 'त्या' १८ अहवालांची वर्धा आरोग्य विभागाला प्रतीक्षा

'त्या' १८ अहवालांची वर्धा आरोग्य विभागाला प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे४१ अहवाल कोरोना निगेटिव्ह हिवरा तांडा आणि वाशीम येथील रुग्णाच्या निकट संपर्कात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह असून उर्वरित १८ व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे वर्धा जिल्हा कोविड सेंटर समन्वयक डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली आहे.
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर हिवरा तांडा परिसरात कंटेन्टमेंट व बफर झोन तयार करून एकूण १३ गावे सील करीत त्या गावांमधील व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोकला व घसादुखीची लक्षणे आहेत काय याची शहानिशा तयार करण्यात आलेल्या २५ विशेष चमूच्या सहाय्याने केली जात आहे. दम्याचा आजार असलेली ही महिला सुरूवातीला आर्वी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. तर नंतर तिला तिच्या कुटुंबीयांनी आर्वी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यात कोरोनाची लक्षणे आढल्यानंतर तिला तातडीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. पण त्यानंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शिवाय तिच्या निकट संपर्कात आलेल्या एकूण २८ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. या २८ पैकी २३ व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तर वाशीम जिल्ह्यातील कवठळ येथील एक ६४ वर्षी रुग्ण उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर त्याचा स्वॅब घेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १८ व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून १३ व्यक्तींच्या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

Web Title: Wardha Health Department is waiting for those 18 reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.