कदम रुग्णालयात १० दिवसांत ७० सोनोग्राफी; आर्वीतील प्रकरणात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:55 AM2022-01-22T09:55:02+5:302022-01-22T09:56:28+5:30
सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती असून यापैकी अंदाजे ४४ सोनोग्राफींच्या फॉर्मवर पेशंटच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
- चैतन्य जोशी/राजेश साेळंकी
वर्धा/देऊरवाडा (आर्वी) : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात आता नवनवे खुलासे होत असतानाच डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम चालवित असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये १ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ७० सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती असून यापैकी अंदाजे ४४ सोनोग्राफींच्या फॉर्मवर पेशंटच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आर्वी येथील गर्भपात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असताना आरोग्य विभागालाच प्रकरणाचे गांभीर्य समजले नसल्याचे दिसते. पीसीपीएनडीटी कमिटीने ४८ तासांत चौकशी अहवाल न्यायालयात सादर करणे आवश्यक असतानाही तब्बल ११ दिवसांनी अहवाल सादर करण्यात आला.
कदम सोनोग्राफी सेंटरमध्ये १ ते १० जानेवारी दरम्यान ७० सोनोग्राफी झाल्या मात्र, यातील अनेक सोनोग्राफी फॉर्मवर पेशंटची आणि डॉक्टरांची स्वाक्षरी आढळून आली नाही. तसेच सोनोग्राफीचे कारणही नमूद केले नसल्याचे आढळले.
एफ फॉर्ममध्येही अनेक त्रुटी आढळल्या. मात्र, अजूनही आरोग्य विभागाकडून हवी तशी कारवाई केली जात नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आरोग्य संचालकांनी केली कदम हॉस्पिटलची पाहणी
शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलची पाहणी करून अवैध गर्भपाताचे गांभीर्य जाणून घेतले. डॉ. पाटील यांनी त्यांच्या आर्वी दौऱ्यादरम्यान आर्वी उपजिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांशी बैठक घेत आतापर्यंत झालेल्या चौकशीची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांची उपस्थिती होती.
परिचारिकांचा जामीन फेटाळला
डॉ. रेखा कदम हिला सहकार्य करणाऱ्या परिचारिका संगीता गळे आणि पूजा दहाट यांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांनी विशेष जिल्हा व सत्र पॉक्सो न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही परिचारिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.