वर्धा गर्भपात प्रकरण : पोलीस, आरोग्य, वन विभागानंतर आता नगरपालिका आवळतेय पाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:02 AM2022-01-20T11:02:50+5:302022-01-20T11:09:29+5:30
आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर प्रारंभी पोलीस, नंतर आरोग्य आणि त्यानंतर वन विभागाने शिकंजा कसला आणि आता या हॉस्पिटलवर 'बायो मेडिकल वेस्ट'ची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा ठपका ठेवून आर्वी नगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महेश सायखेडे
वर्धा : अवैध गर्भपात-भ्रूणहत्येमुळे बहुचर्चित ठरलेल्या आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर प्रारंभी पोलीस, नंतर आरोग्य आणि त्यानंतर वन विभागाने शिकंजा कसला आणि आता या हॉस्पिटलवर 'बायो मेडिकल वेस्ट'ची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा ठपका ठेवून आर्वी नगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण नियमाला वाकुल्या दाखवीत बायो मेडिकल वेस्टची नियमबाह्य विल्हेवाट लावली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १७ जानेवारीला प्रकाशित केले होते. याच वृत्ताची दखल घेत आर्वी नगरपालिकेने हॉस्पिटलला मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी नोटीस घेऊन कदम हॉस्पिटलला पोहोचल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी नोटीस घेण्यास साफ नकार दिला; पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हार न मानता हॉस्पिटलच्या दर्शनी भागात ही नोटीस चिकटविली. एकूणच पोलीस, आरोग्य, वन विभागानंतर आर्वी नगरपालिकेने कदम हॉस्पिटलवर कठोर कारवाईसाठी शिकंजा कसला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविली प्रत
आर्वी नगरपालिकेने बजावलेल्या नोटीसमुळे कुमारसिंग व शैलेजा कदम आणि नीरज व रेखा कदम यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. नोटीसच्या अनुषंगाने कदम कुटुंबीयांना लवकरच आपली लेखी बाजू मांडावी लागणार आहे. या नोटीसची एक प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्वीच्या कदम हॉस्पिटलने जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६चे उल्लंघन केल्याचे पुढे आल्याने या हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
- विजय देवळीकर, मुख्याधिकारी, न.प., आर्वी