औषधी प्रकरणात कदम दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 12:56 PM2022-02-11T12:56:01+5:302022-02-11T12:59:11+5:30
न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे.
राजेश सोळंकी/पुरुषोत्तम नागपुरे
देऊरवाडा/आर्वी (वर्धा) : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. रेखा कदम आणि सहआरोपी डॉ. नीरज कदम यांना शासकीय रुग्णालयातील औषधांच्या अवैध साठाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले. त्यांना चौकशीकरिता आर्वीत आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, विशेष जिल्हा सत्र न्यायाधीशांसमक्ष हजर केले असता, त्यांनी कदम दाम्पत्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शैलजा कदम आणि डॉ. कुमारसिंह कदम यांना १४ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर पोलिसांना आपले म्हणणे मांडायचे होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनोने आणि मदतगार इम्रान खिल्ची यांनी ९ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात म्हणणे (से) मांडले.
न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनोने, पाेक्साे सेलच्या पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी व डी. बी. पथकाने हॉस्पिटलची झाडाझडती घेतली होती. त्यामध्ये पोलिसांना ९७ लाखांची रोकड, काळविटाची कातडी व शासकीय रुग्णालयात वापरणाऱ्या ९० पिटोसीन इंजेक्शन, ७१ हजार ७७२ गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा आढळून आला होता.
औषधी अपहारात कोण गळाला लागणार?
कदम दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असल्याने अवैध शासकीय औषधीचा तपास थांबला होता. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी न्यायालयाकडे अर्ज करून या दोघांचा प्रोटेक्शन वॉरंट मागितला होता. न्यायालयाने तो मान्य केल्यामुळे त्यांना चौकशीसाठी आर्वीत आणण्यात आले. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीशांनी १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यामुळे औषधी अपहार प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणते कर्मचारी पोलिसांच्या गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.