वर्धा गर्भपात प्रकरण : कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता शनिवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 11:30 AM2022-02-01T11:30:01+5:302022-02-01T11:32:59+5:30
अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम आणि सहआरोपी तथा रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
वर्धा : आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज सादर केला आहे. याच जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश राजश्री विजय अदोणे यांच्यासमक्ष सुनावणी निश्चित होती. पण प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आणि आरोपीच्या वकिलांची विनंती न्यायाधीशांनी मान्य केल्याने आता शनिवार ५ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम आणि सहआरोपी तथा रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर रेखा यांच्या सासू डॉ. शैलेजा व सासरे डॉ. कुमारसिंग कदम यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ जानेवारीला फेटाळला. शिवाय अवैध गर्भपातासाठी सहकार्य करणाऱ्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील परिचारिका संगीता संजय काळे व पूजा दयाराम दाहाट यांचा जामीन अर्ज २१ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष म्हणजे डॉ. रेखा व नीरज कदम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.