बारा जिल्ह्यांना ‘ऑक्सिटोसीन’चा पुरवठा; पण नजर केवळ वर्ध्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 11:49 AM2022-02-10T11:49:28+5:302022-02-10T11:56:14+5:30
कदम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात शासकीय ऑक्सिटोसीन कसे आले, त्याची नेमकी गळती वर्धा जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयातून झाली याचा शोध घेत असताना औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाचाच रेकॉर्ड तपासण्यात आला आहे.
महेश सायखेडे
वर्धा : राज्यात खळबळ माजविणाऱ्या आणि अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये तपास करणाऱ्यांना शासकीय पुरवठा असलेल्या एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०४० या बॅच क्रमांकाचे तब्बल ९० ऑक्सिटोसीन इंजेक्शन सापडल्याने पोलीस, आरोग्य अन् औषध प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत. आता याच बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांना पुरवठा झाल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे औषध प्रशासन ऑक्सिटोसीनची गळती शोधण्यासाठी केवळ वर्धा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
एका खासगी एजन्सीमार्फत एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०४० या बॅच क्रमांकांच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वर्धा जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकांना पुरवठा करण्यात आला आहे. कदम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात शासकीय ऑक्सिटोसीन कसे आले, त्याची नेमकी गळती वर्धा जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयातून झाली याचा शोध घेत असताना औषध प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत केवळ आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाचाच रेकॉर्ड तपासण्यात आला आहे. पण, या शासकीय ऑक्सिटोसीनचा राज्यातील तब्बल बारा जिल्ह्यांना पुरवठा झाल्याने आणि वर्धेच्या औषध प्रशासनाचे कार्यक्षेत्र केवळ वर्धा जिल्ह्यापुरतेच मर्यादित असल्याने ऑक्सिटोसीनच्या अपहाराचे केंद्र शोधणे हे सध्या औषध प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
औषध विभागाच्या राज्यस्तरीय चौकशी समितीची गरज
कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपातामुळे संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असली तरी महिना लोटायला आला तरी या हॉस्पिटलमध्ये शासकीय ऑक्सिटोसीन कुठून आले, याचा साधा धागाही चौकशी करणाऱ्या यंत्रणेला गवसलेला नाही. औषधांचा विषय शासनाच्या औषध प्रशासनाकडे येत असला तरी वर्धा जिल्ह्यातील औषध प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात वर्धा जिल्हा वगळता इतर जिल्हे येत नाहीत. त्यामुळे शासकीय ऑक्सिटोसीनच्या गळतीचे केंद्र शोधण्यासाठी राज्यस्तरीय विशेष चौकशी समिती नेमण्याची गरज व्यक्त होत आहे.
मोठा घोटाळा उघडकीस येऊन बडे अधिकारी अडकण्याची शक्यता
ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या गळतीचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी समिती गठीत करून सखोल तपास केल्यास शासकीय औषधांच्या अफरातफरीबाबत मोठा फ्रॉड पुढे येऊन आरोग्य यंत्रणेतील बडे अधिकारीही चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पण, आरोग्यमंत्री यात लक्ष घालून राज्यस्तरीय चौकशी समिती गठित करतात काय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
असा झाला पुरवठा
कोल्हापूर : ८,३३८
सांगली : ६,८२०
सिंधुदुर्ग : ७,४०२
जालना : २९,०७९
हिंगोली : २२,२६३
उस्मानाबाद : २९,७४२
यवतमाळ : ३२,०३०
बुलडाणा : ३४,६९८
वर्धा : २३,३९१
नागपूर : २७,८६७
चंद्रपूर : १५,५६८
गडचिरोली : १०,०००