ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात वर्धेचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:29 AM2017-07-20T00:29:22+5:302017-07-20T00:29:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गावांना आदर्श, शाश्वत विकासासह सक्षम
जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून साधणार गावांचा विकास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गावांना आदर्श, शाश्वत विकासासह सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन व खाजगी कंपन्यांच्या मदतीने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. यात वर्धा जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुशिक्षित युवकांना गाव विकासात सहभागी करून घेण्यात येत आहे.
खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आतापर्यंत विखूरलेली विकास कामे करण्यात येत होती; पण पहिल्यांदाच देशात शासन आणि खासगी क्षेत्रातील पार्टनरशिपमधून अशा प्रकारचे अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. यात खासगी निधीचा योग्य पद्धतीने विकास कामांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सहभागी कंपन्यांचे प्रमुख असलेली शासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये इतर क्षेत्रातील व्यक्तींचाही सहभाग घेण्यात येणार आहे. अभियानाचा मुख्य उद्देश मानव निर्देशांकामध्ये माघारलेल्या १ हजार गावांचा शाश्वत विकास करणे, हा आहे. यात थेट खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येत आहे. १० खासगी कंपन्यांचे प्रमुख सहभागी आहेत. शिवाय सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही सहभाग यात घेण्यात आला आहे.
दर्जेदार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कृषी उत्पादनात वाढ करणे, स्वच्छ पाणी, गावात इंटरनेट जोडणी देणे, गावातील सर्वांसाठी पक्की घरे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवून रोजगाराच्या संधी मिळवून देणे या लक्ष्यांकावर काम करणार आहे. या अभियानात वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून देवळी तालुक्यातील १२ व आर्वी तालुक्यातील ६ अशा १८ ग्रामपचांयती यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १८ गावांमध्ये १८ मुख्यमंत्री ग्रामविकास सहकारी नियुक्त केले आहेत. हे सहकारी त्यांना देण्यात आलेल्या गावाचे प्राथमिक सर्वेक्षण करतील. यात कुटुंब, दरडोई उत्पन्न, शिक्षणाचे प्रमाण, अपंगांची संख्या, गावातील सोई-सुविधा, पिके, कृषी, सिंचन क्षेत्र, त्यातील सुविधा, शाळा, आरोग्य सुविधा आदींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या आधारावर ग्रामस्थांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत हा गाव विकास आराखडा मंजूर करून घ्यायचा आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा अभियान परिषद स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी परिषदेचे अध्यक्ष तर जि.प. सीईओ, अति. जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं., उन्नत महा. अभियानांतर्गत शैक्षणिक संस्थेचा प्रतिनिधी व ग्रामविकास सहकारी यांचा समावेश आहे.
१८ मुख्यमंत्री ग्रामविकास सहकारी नियुक्त
मुख्यमंत्री ग्रामविकास सहकारीची निवड केली आहे. ग्रा.पं. ग्रामसभा व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे सहकारी वर्षभर गावात राहून शाश्वत विकासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत करतील. शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती, योजनांचा लाभ मिळवून देणे, ग्रामस्थांचा गाव विकास निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, निधीचा चांगल्याप्रकारे वापर करणे यावरही काम करतील.