वर्धा कृउबा समितीच्या सभापतीची खातेनिहाय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 03:25 AM2015-09-19T03:25:53+5:302015-09-19T03:25:53+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद शरद देशमुख हे मागील ३० वर्षांपासून सांभाळत आहेत.
मुख्यमंत्र्याचे निर्देश : सहायक निबंधक चौकशी करणार
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद शरद देशमुख हे मागील ३० वर्षांपासून सांभाळत आहेत. दरम्यान त्यांनी नियमबाह्य व मनमानीने कारभार चालविल्याच्या तक्रारीच्या आधारे त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश सहकारी संस्था वर्धेचे जिल्हा उपनिबंधक यांनी सहायक निबंधकाला दिले आहे. या अनुषंगाने शुक्रवारपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे.
रमेश वालदे यांनी मुख्यमंत्री यांना १२ आॅगस्ट रोजी सभापती शदर देशमुख यांच्या कारभाराची तक्रार केली. या आधारे मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करुन रिपोर्ट सादर करावा, असे निर्देश जिल्हा उपनिबंधकाला दिले होते. या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. मंत्रालयातून चौकशी करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक उपनिंबधकांना चौकशी करण्यासाठी ते पत्र दिलेले आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. उपनिबंधक कार्यालयाकडून होणार असलेल्या या चौकशीत नेमके काय होते याकडे बाजार समितीच्या नव्या संचालकांसह जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)