वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांची ५ हजारांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:27 AM2019-05-23T10:27:12+5:302019-05-23T10:39:04+5:30
Wardha Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या निवडणूक निकालांच्या मतमोजणीत भाजपच्या रामदास तडस यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: लोकसभेच्या निवडणूक निकालांच्या मतमोजणीत भाजपच्या रामदास तडस यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना पहिल्या फेरीत २३०१५ मते मिळाली आहेत तर कॉंग्रेसच्या चारुलता टोकस यांना १५१९९ मते मिळाली आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे रामदास तडस यांनी काँग्रेसचे येथील दिग्गज नेते दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांना पराभूत केले होते. यात तडस यांना ५,३७,५१८ मते तर मेघे यांना ३,२१,७३५ मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसविरोधी असलेला जनआक्रोश आणि मोदी लाट यामुळे तडस हे २,१५,७८३ मताधिक्याने निवडून आले होते.
वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या जाहीर सभांनंतर येथील लढतीत रंगत आली. निवडणूक जातीय समीकरणांकडे झुकण्याची नेहमीची परंपरा याहीवेळी या मतदारसंघात असल्याचे चित्र होते.
विकासाचा भाजपचा मुद्दा मागे पडून काँग्रेस पक्षाने प्रचारात मुसंडी मारली होती. राष्ट्रवादीत असलेला नाराजीचा उद्रेक निवडणुकीत दाट होण्याची शक्यता होती. तसेच भाजपामधील नाराजांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नजर होती. काँग्रेस पक्षाची नजर प्रामुख्याने दलित व मुस्लीम मतांवर होती. काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस या हरियाणा राज्यातील गुडगावच्या असल्याने त्यांच्याविषयी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दुराव्याची भावनाही प्रचार काळात व्यक्त झाली होती.