Wardha Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतर अमर काळे ९ हजार मतांनी आघाडीवर
By रवींद्र चांदेकर | Published: June 4, 2024 12:15 PM2024-06-04T12:15:28+5:302024-06-04T12:18:37+5:30
Wardha Lok Sabha Results 2024 : तीन फेऱ्यांअंती अमर काळे यांना एकूण ६६ हजार ३८४ मते
Wardha Lok Sabha Results 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघात तीन फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे ९ हजार ३९ मतांनी आघाडीवर आहे. तीन फेऱ्यांअंती त्यांना एकूण ६६ हजार ३८४, तर भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना ५७ हजार ३४५ मते मिळाली.
पहिल्या फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी केवळ १८ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अमर काळे यांनी ती १८ मते भरून काढत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत काळे यांना १९ हजार ५६५, तर तडस यांना १९ हजार ५८३ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत काळे यांना २१ हजार ९९९, तर तडस यांना १६ हजार ७३१ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत काळे यांना २४ हजार ८२०, तर तडस यांना २१ हजार ३१ मते मिळाली आहे. बसपाचे मोहन राईकवार दोन हजार ६६० मते घेत तिसऱ्या, तर अपक्ष आसीफ दोन हजार ३८० मते घेत चौथ्या क्रमांकावर आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून या सहाही मतदारसंघातून तब्बल २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये भाजपाचे रामदास तडस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. राजेंद्र सोळंखे, बहुजन समाज पार्टीचे डॉ. मोहन राईकवार यांच्यासह १३ पक्षाचे तर ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपा विरुद्ध शरद पवार गट यांच्यातच राहिली. २६ एप्रिलला मतदानात ६४.८५ टक्क्यांचा टप्पा गाठला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३.६७ धामणगाव टक्क्यांनी मतदान वाढले आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीतही भाजपाकडून खासदार रामदास तडस रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अॅड. चारुलता ठोकस यांनीही लोकसभेच्या मैदानात आपले भविष्य आजमावले होते. अॅड. चारुलता टोकस यांची मतदारसंघात असणारी अनुपस्थिती तसेच केंद्रातील भाजप सरकारची विकासकामे लक्षात घेऊन मतदारांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या बाजूने कौल दिला होता. रामदास तडस हे १ लाख ८९ हजार मतांनी विजयी झाले होते. रामदास तडस हे २०१४ पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असून आता पुन्हा तिसऱ्यांदा ते खासदारकीसाठी रिंगणात आहे.