वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 09:35 PM2019-08-10T21:35:36+5:302019-08-10T21:36:31+5:30
येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचा व्याप मोठा असला तरी दुर्लक्षित धोरणामुळे सध्या या ठाण्याला गळती लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, छतावरील टिना फुटल्याने व त्याची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती न करण्यात आल्याने थोडा जरी पाऊस आला की या पोलीस ठाण्यातील काही भागाला तळ्याचे स्वरूप येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचा व्याप मोठा असला तरी दुर्लक्षित धोरणामुळे सध्या या ठाण्याला गळती लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, छतावरील टिना फुटल्याने व त्याची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती न करण्यात आल्याने थोडा जरी पाऊस आला की या पोलीस ठाण्यातील काही भागाला तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील महत्त्वाचे दस्तऐवज भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याची सध्याची इमारत जीर्ण झाली असल्याने नवीन इमारत तयार करण्याचे विचाराधीन होते. त्या अनुषंगाने सध्या कामही होत आहे. परंतु, ज्या इमारतीतून वर्धा लोहमार्ग पोलिसांचे कामकाज चालते त्या इमारतीच्या छताच्या काही टिना ठिकठिकाणी फुटल्या असल्याने थोडाजरी पाऊस आला की पोलीस ठाण्यातील काही परिसराला तळ्याचे स्वरूप येत असल्याचे बघावयास मिळते. पोलीस ठाण्याच्या छताला गळती लागत असल्याने याचा नाहक त्रास तेथील कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. याच पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्याची दस्तऐवज ठिकठिकाणी ठेवण्यात आली आहे. परंतु, छत गळतीमुळे ते दस्ताऐवज पावसाच्या पाण्यात भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तातडीने योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
विद्युत प्रवाहाचा झटका बसण्याची शक्यता
वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या छतावरील टिन ठिकठिकाणी फुटल्या असल्याने थोडा जरी पाऊस आला की भिंतीनाही आलोवा येतो. याच भिंतीवर ठिकठिकाणी पंखा, लाईट व इतर विद्युत साहित्य सुरू किंवा बंद करण्याच्या बटनांचे बोर्ड बसविण्यात आले आहेत. संपूर्ण भिंतच छताला गळती लागल्याने ओली होत असल्याने सध्या विद्युत प्रवाहाचा सौम्य झटका अनेकांना बसत असल्याचे सांगण्यात येते. त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे.