वर्धा पालिकेचा ‘मॉल’ ठरणार जिल्ह्यातील प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:58 PM2018-04-21T23:58:41+5:302018-04-21T23:58:41+5:30
नगर परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात होतकरू बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अत्याधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’चा अवलंब होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगर परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात होतकरू बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अत्याधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’चा अवलंब होणार आहे. सदर काम जलदगतीने पुर्णत्वास जावे म्हणून न.प. प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वर्धा नगर परिषदेचा हा अत्याधुनिक ‘मॉल’ जिल्ह्यातील स्वराज्य संस्थांचा पहिलाच ठरणार आहे.
शहरातील ज्या ठिकाणी न.प. ची इंग्रजकालीन इमारत होती, त्याच ठिकाणी या अत्याधुनिक व्यापारी संकुलाची निर्मिती होणार आहे. तत्कालीन नगराध्यक्षांच्या कार्यकाळात याच ठिकाणी न.प. ची प्रशस्त इमारत तयार करण्यात येणार होती; पण कंत्राटदार व वर्धा न.प. प्रशासनात तांत्रिक अडचण आल्याने हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सध्या हा वाद मिटल्याचे न.प. सदस्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे अत्याधुनिक व्यापारी संकूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या या अत्याधुनिक व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचा अवलंब होणार आहे. सदर व्यापारी संकुल कसे असावे, यासाठी ‘एक्स्प्रेशन्स आॅफ इंटरेस्ट’ मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘एक्स्प्रेशन्स आॅफ इंटरेस्ट’ने होणार स्पर्धा
नगर पालिकेच्या नवीन इमारतीमधील फनिचर खरेदीबाबत एक्स्प्रेशन्स आॅफ इंटरेस्ट प्रणालीचा वापर करण्यात आला. न.प. च्या या प्रयोगाला सुमारे १५ तज्ज्ञांकडून प्रतिसाद मिळाल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचेच बोलले जात आहे. याच पार्श्वभूमिवर न.प. च्या जुन्या इमारत परिसरात तयार करण्यात येणाºया अत्याधुनिक व्यापारी संकुलासाठीही एक्स्प्रेशन्स आॅफ इंटरेस्ट मागविण्यात येणार आहे. या पद्धतीच्या अवलंबामुळे स्पर्धा वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
उत्पन्नात होणार वाढ
सदर अत्याधुनिक व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी नगर परिषद प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. शासनाच्या कुठल्याही विभागाकडून सध्या यासाठी निधी प्राप्त झालेला नाही. इतकेच नव्हे तर हे व्यापारी संकूल पब्लिक प्रायवेट पार्टनरशीपचा अवलंब करीत तयार करण्यात येणार आहे. सदर व्यापारी संकूल तयार झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, हे मात्र निश्चित!
दुर्लक्षामुळे १४ वर्षांत न.प.चे कोट्यवधीचे नुकसान
सुमारे १४ वर्षांपूवी नगरपरिषदेची जुनी व इंग्रजकालीन इमारत पाडली गेली; पण तेव्हापासून तेथे पालिकेची इमारत वगळता काय तयार करावे यासाठी कुठल्याही नगराध्यक्षांकडून प्रयत्न झाले नाही. एखादे व्यापारी संकुल झाले असते तर वर्षाला किमान एक कोटीचे उत्पन्न नक्कीच मिळाले असते; पण दुर्लक्षामुळे १४ वर्षांत काहीही झाले नाही. यामुळे पालिकेला किमान १४ कोटींचे नुकसानच सहन करावे लागल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी केला आहे.