शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा-नागपूर महामार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 05:00 AM2021-02-07T05:00:00+5:302021-02-07T05:00:42+5:30
दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/पवनार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोनाला पाठिंबा देत, विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येत, शनिवारी दुपारी वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे रास्तारोको आंदोलन केले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांशी निगडित तिन्ही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू राहिल्याने वर्धा-नागपूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, गोपाल दुधाने, विठ्ठल झाडे, प्रफुल्ल कुकडे, माकपचे राज्य सचिव यशवंत झाडे, संजय भगत, समीर बोरकर, प्रभाकर धवने, भैय्या देशकर, दुर्गा काकडे, अर्चना घोघरे, आशा ईखार, रामभाऊ ठवरी, काँग्रेसचे मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, अविनाश सेलुकर, पंकज इंगोले, मिलिंद मोहोड, अभिजीत चौधरी, आपचे प्रमोद भोमले, नितीन झाडे, मंगेश शेंडे, तुळशीराम वाघमारे, मनोज तायडे, महेंद्र मुनेश्वर, प्रभाकर चोंदे, निरज गुजर, मनोज कांबळे, पंकज सत्यकार, अस्लम पठाण, प्रसाद बागवे, राकाँचे ॲड.मिलिंद हिवलेकर, संजय काकडे, संदीप किटे, प्रवीण काटकर, योगेश घोगरे, पराग खंगार, ॲड.पूजा जाधव, श्रेया गोडे, जगदीश डोळसकर, गजेंद्र सुरकार, दिवाकर शंभरकर, सुरेश बोरकर, दिलीप मसराम, मधुकर भोयर, सुमेर ठाकूर, पवन दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले. तेथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
पोलिसांची दमछाक
आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीत
पवनार येथील रास्तारोको आंदोलनामुळे पवनार ते वर्धा तर पवनार ते सेलू या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल अर्धातासांचा कालावधी लागला, हे विशेष.
आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
शनिवारी जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत.) हिंगणघाट, वायगाव, धोत्रा चौरस्ता आदी ठिकाणी शेतकरी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह डाव्या पक्षांनी रस्ता राेको आंदोलन केले. याला शेतकरी व शेतमजूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.