अवघ्या ४.७१ लाखांसाठी वर्धा जिल्हा कचेरीवर जप्तीची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 01:18 PM2022-03-12T13:18:49+5:302022-03-12T16:39:45+5:30
जमिनीचा मोबदला द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करू, असा पवित्रा यावेळी फिर्यादीने घेतला.
वर्धा : वर्धा - नांदेड या रेल्वे मार्गासाठी देवळी तालुक्यातील इसापूर येथील शकुंतला रामभाऊ नखाते यांच्या १.४० हे. आर. शेतजमिनीपैकी ५६ हे. आर शेतजमीन संपादित करण्यात आली. मात्र, या जमिनीचा ४ लाख ७१ हजार ७१० रुपयांचा वाढीव मोबदला देण्यात न आल्याने न्यायालयीन कामकाजाचा एक भाग म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सकाळी १० वाजता न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह फिर्यादी पोहोचले.
जमिनीचा मोबदला द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करू, असा पवित्रा यावेळी फिर्यादीने घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: हा विषय निकाली काढण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह शकुंतला नखाते यांच्याकडे संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंतचा वेळ मागितला. मध्यंतरीच्या काळात उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार आणि रेल्वे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी वर्धा येथील तिसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेश बी. राजा यांचे न्यायालय गाठून फिर्यादीला मोबदला देण्यासाठी काही वेळ देण्याची विनंती केली.
वर्धा येथील सहदिवाणी न्यायालयानेही विनंती मान्य केल्याने अखेर संध्याकाळी ४.३०च्या सुमारास जिल्हा कचेरीवरील जप्तीची नामुष्की टळली. फिर्यादीला येत्या पंधरा दिवसात मोबदला देण्यात येईल, अशी हमी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली असली, तरी जप्तीच्या नामुष्कीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
पूर्वी मिळाला केवळ २ लाख ४ हजारांचा मोबदला
वर्धा - नांदेड रेल्वे मार्गासाठी शकुंतला नखाते यांची ५६ हे. आर. जमीन अधिग्रहित केल्यावर त्यांना जमिनीचा मोबदला म्हणून केवळ २ लाख ४ हजारांची रक्कम देण्यात आली. पण ही रक्कम तोकडी असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेत वाढीव मोबदला मिळण्यासाठी याचिका दाखल केली. शकुंतला नखाते यांना वाढीव मोबदला देण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश असतानाही मागील दोन वर्षांपासून मोबदला न देण्यात आल्याने जप्तीबाबतची याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर तिसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेश बी. राजा यांनी जप्तीच्या कारवाईचा आदेश निर्गमित केल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचा घेतला होता पवित्रा
६५ वर्षीय शकुंतला नखाते, शकुंतला यांची सून मनीषा गणेश नखाते, बेलिफ गणेश अंजनकर, एम. डी. पजई, फिर्यादीचे वकील ॲड. नरेंद्र हांडे हे जप्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सुरूवातीला त्यांना प्रशासकीय इमारतीत भूसंपादन कार्यालयात पाठविण्यात आले. तब्बल तीन तास जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या येरझारा मारल्यावर हतबल झालेल्या शकुंतला नखाते यांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची खुर्चीच जप्त करा, असे सांगितल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी चर्चा झाली. अखेर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात हमी दिल्याने जिल्हा कचेरीवरील जप्तीची कारवाई टळली.
शकुंतला अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त
शकुंतला नखाते यांच्या पतीचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा मुलगा गणेश याचा १२ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त असलेल्या शकुंतला यांनी त्यांची सून मनीषा हिच्यासोबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. रेल्वे रुळासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आल्याने शेताचे दोन तुकडे पडले असल्याचे नखाते यांनी सांगितले.
काय घडले
१०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जप्तीची कारवाई करण्यासाठी पोहोचले.
०१.३० वाजता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा झाली.
२.०४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी चर्चा झाली.
२.०७ वाजता न्यायालयीन अधिकारी व फिर्यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर निघाले.
२.१२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चर्चेसाठी पुन्हा पाचारण करण्यात आले.
२.२४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर दुपारी ४.३० वाजेपर्यंतचा कालावधी घेण्यात आला.
४.३० वाजता जिल्हा कचेरीवरील जप्तीची कारवाई टळली.