वर्धा न.प. उपाध्यक्ष व बाजार समिती सभापतीचा सोमवारी फैसला
By admin | Published: September 26, 2016 02:10 AM2016-09-26T02:10:28+5:302016-09-26T02:10:28+5:30
येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर आलेल्या
अविश्वासावर बैठक : वर्धेकरांचे लक्ष
वर्धा : येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर आलेल्या अविश्वासावर शिक्कामोर्तब करण्यासंदर्भात सोमवारी दोनही ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभेत दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अविश्वास पारित होतो अथवा तो बारगळतो याकडे वर्धेकरांचे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सभांमुळे वर्धेत सोमवार अविश्वास ‘वार’ ठरण्याची चर्चा जोरात आहे.
वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरीया पालिकेत एकाधिकारशाही राबवित असल्याने विकास कामांना अडसर ठरत असल्याचा आरोप करीत इतर सदस्यांनी एकत्र येत त्यांच्यावर अविश्वास आणला. यात पालिकेतील ३९ पैकी २६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्याबाजूने आपले मत दिल्याची माहिती आहे. तो ठराव त्यांनी नगराध्यक्षाकडे सादर केला आहे. या अविश्वास ठरावावर सोमवारी पालिकेत सभा आयोजित आहे. या सभेत त्यांच्यावर अविश्वास पारीत होतो अथवा तो बारगळतो याकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.
सोबतच अविश्वासाच्या कारणाने सध्या चर्चेत असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम कार्लेकर यांनी पक्षाचा आदेश धुडकावत बंडखोरी करून सभापतीपद बळकावले. या निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठतेच्या कारणातून अविश्वास ठराव आणण्यात आला. या ठरावाच्या बाजूने एकूण १३ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावरही सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता सदस्य बंडखोराच्या बाजून आहे व कोणता सदस्य पक्षाच्या बाजूने आहे हे कळणे कठीण झाले आहे. सभापती आपले पद कायम राखण्याकरिता काही सदस्यांना घेवून ‘आऊट आॅफ कव्हरेज’ आहेत. यामुळे या सभेत नेमके काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. दोन्ही प्रकारणात होणाऱ्या निर्णयाकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
पालिकेचे पाच सदस्य ‘आऊट आॅफ कव्हरेज’
पालिकेतील पाच सदस्य आऊट कव्हरेज आहे. या सदस्यांना घेवून प्रदीपसिंह ठाकूर बेपत्ता असल्याची माहिती आहे. यात काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व बसपाचा एक असे पाच सदस्य असल्याची माहिती आहे. या संदर्भात ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेत उपाध्यक्षावर येत असलेला अविश्वास ठराव हा ‘फ्लॉप शो’ ठरणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अविश्वास आणणारे सदस्य सहलीवर
अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात पुढकार घेणारे सदस्य रविवारी सायंकाळी अज्ञातस्थळी सहलीवर रवाना झाले असून ते सर्व सोमवारी सकाळी सभेच्यावेळीच उपस्थित होणार असल्याची माहिती आहे. अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर कुठलाही दबाव येऊ नये याकरिता ही सहल असल्याचे बोलले जात आहे.